Advertisement

समाजकारणातून राजकीय महामार्गावर

प्रजापत्र | Thursday, 05/09/2024
बातमी शेअर करा

बीड : मराठा समाजातील पहिला सीए, मराठा क्रांती मोर्चाचे एक समन्वयक , शिक्षण, उद्योग क्षेत्रात स्वतःची अशी एक वागली ओळख , आणि सामाजिक कामांमध्ये सक्रिय सहभाग असा आजपर्यंतचा प्रवास असलेल्या बी. बी. जाधव यांनी सध्या बीडच्या विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बी बी जाधव इच्छुक आहेतच, त्यासोबतच इतर काही सामाजिक समीकरणे जुळतील का यावरही त्यांचा भर आहे.
बीडमध्ये बी. बी. जाधव यांची ओळख होती ती सीए म्हणून. अगदी काही वर्षांपर्यंत सीए म्हणून काम करताना त्यांनी अनेक समाजघटकांना स्वतःशी जोडून घेतले होते . जरी मराठा समाजातील पहिला सीए अशी त्यांची ओळख होती, तरी त्यांचा व्यवसायाचा आणि मित्रांचा पसारा मात्र जातीपातीपलीकडचा . सीए म्हणून काम करतानाच उद्योग, शिक्षण आदी क्षेत्रांनमध्ये त्यांचा वर सुरु झाला, त्यातूनच त्यांच्यातले समाजकारणी अंग लोकांच्या परिचयाचे झाले.

नंतर राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली आणि बीडमध्ये बी. बी. जाधव यांच्याकडे समन्वयक म्हणून जबाबदारी आली. त्यानंतर त्यांचा राजकारण, समाजकारणातला वावर अधिकच वाढला. त्यातूनच मग बी. बी. जाधव यांच्या राजकारण प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या. वेगवेगळ्या जाती धर्मात असलेला संपर्क, एक दृष्टी असलेला चेहरा आणि राजकारणाची माहिती अशा अनेक बाबी त्यांच्यासाठी जमेच्या बाजू. खरेतर लोकसभा निवडणुकीच्या वेळीच त्यांचा राजकारण प्रवेश झालंही असता, पण प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ यावी लागते. आता बीड विधानसभेसाठी त्यांनी हाबुक ठोकली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ते इच्छुक आहेत. क्षीरसागर विरोध आणि स्वतःच्या विकासाच्या संकल्पना हा अजेंडा घेऊन ते जनसामान्यांच्या प्रश्नांवर बोलत आहेत. आता हा प्रवास आणखी कोणती वळणे घेतो हे काळच ठरवेल.

Advertisement

Advertisement