गेवराई दि. ४ (प्रतिनिधी ) : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा पगडा असलेला गोदा आणि सिंदफणा काठ असलेल्या गेवराई मतदारसंघात एकीकडे मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांसोबतच मनोज जरांगे , लक्ष्मण हाके या मराठा आणि ओबीसी आंदोलनाची पार्श्वभूमी आणि त्यातच प्रस्थापित विरोध अशा अनेक अंगांनी अनेकांनी विधानसभा निवडणुकीची कट्यारी सुरु केली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ बहुरंगी लढतीच्या मार्गाने जाईल अशी शक्यता आज तरी आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघ हा सध्या सर्वात हॉट किंवा संवेदनशील म्हणावा असा मतदारसंघ झालेला आहे. राज्यात मराठा आरक्षण आंदोलन सुरु झाले, त्या आंदोलनाला बीड जिल्ह्यातून सर्वाधिक कुमक केली ती याच मतदारसंघाने . गोदावरी आणि सिंदफणा काठची या मतदारसंघातली १०० पेक्षा अधिक गावे 'मनोज जरांगे म्हणतील तसं ' च्या भूमिकेत आजही आहेत तर दुसरीकडेच या मतदारसंघात ओबीसींची संख्या देखील मोठी आहे. ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांचे मोठमोठे कार्यक्रम या मतदारसंघात झाले आहेत. त्यामुळे ओबीसींमधून देखील यावेळी 'राजकीय शक्ती ' दाखविण्याची उर्मी जागी झाल्याचे चित्र सध्या तरी आहे. या दोन घटकांच्या मध्ये मुख्य प्रवाहातील पक्षांचे राजकीय अजेंडे बाजूला पडतील का काय असे चित्र आजच्या घडीला तरी आहे.
या मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रतिनिधी भाजपचे लक्ष्मण पवार आहेत. मात्र भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांशी, म्हणजे पंकजा मुंडेंशी त्यांचे फारसे संख्या नाही .महायुतीमधील दुसरा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित यांच्याशी त्यांची मागच्यावेळी लढत झाली होती. आता यावेळी महायुती असली तरी लक्ष्मण पवार आणि विजयसिंह पंडित दोघेही निवडणुकीच्या रिंगणात असणार हे निश्चित. यापलीकडे जाऊन बदामराव पंडित स्पर्धेत आहेतच. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्या पक्षाच्या किसान आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे इच्छुक आहेत, मात्र त्यांची मोठ्याप्रमाणावर भिस्त अर्थातच मनोज जरांगे काय भूमिका घेतात यावर असणार आहे.
मनोज जरांगे यांच्या आशीर्वादाच्या अपेक्षेने शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पूजा मोरे, काँग्रेसचे महेश बेदरे , यांच्याशिवाय ऋषिकेश बेदरे , महेश दाभाडे , बप्पासाहेब तळेकर हे इच्छुक आहेतच. तर दुसरीकडे ओबीसी आंदोलनाच्या माध्यमातून लस्कह्मण हाके यांचे उमेदवार म्हणून पी. टी. चव्हाण , परमेशवर वाघमोडे ,शिवप्रसाद खेडकर सध्या मोर्चेबांधणी करीत आहेत.
बीआरएसकडून बाळासाहेब मस्के किंवा मयुरी खेडकर उमेदवारीवर दावा करू शकतात , तर निवृत्त महसूल अधिकारी आणि सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांचे भाऊ अशोक मुंडे भाजपकडून जोर लावीत आहेत. जरांगे समर्थक काय किंवा हाके समर्थक, यासर्वांचा मुख्य अजेंडा प्रस्थापित विरोध हाच असणार आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढत बहुरंगी असेल आणि त्याचा फायदा शेवटी प्रस्थापित उमेदवारालाच होईल असे चित्र आज तरी आहे.
प्रजापत्र | Thursday, 05/09/2024
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा