Advertisement

पक्ष कोणता माहित नाही, पण निवडणूक लढवायचीच

प्रजापत्र | Wednesday, 04/09/2024
बातमी शेअर करा

आष्टी दि. ३ (प्रतिनिधी ) : वेगवेगळी सामाजिक समीकरणे आणि वेगवेगळे निकाल देणारा मतदारसंघ म्हणून आष्टी मतदारसंघाची ओळ्ख. कधी दरेकर, कधी धोंडे, कधी धस तर मागच्या वेळी बाळासाहेब आजबे अशी या मतदारसंघाने अनेकांना संधी दिली. यातीलच काही चेहरे कधी एकमेकांसोबत तर कधी एकमेकांच्या विरोधात असेही चित्र तसे सर्वांच्या सवयीचे . आता यावेळी हे चेहरे तर इच्छुक आहेतच, पण त्यासोबतच तानाजी जंजिरेपासून अमोल तरटे यांच्यापर्यंत  अनेकांना विधानसभेचे स्वप्न पडत आहे. यातील काहींचे पक्ष कोणता असेल माहिती नाही, जमले तर पक्षाकडून नाहीतर अपक्ष पण निवडणूक लढवायचीच हे निशचित आहे. त्यामुळे आष्टीची मानसिकता बहुरंगी निवडणुकीची आहे.
आष्टी मतदारसंघ सध्या महायुतीकडे आहे. येथील आमदार बाळासाहेब आजबे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत. तर भाजमध्ये असलेले सुरेश धस यांची विधानपरिषद सद्यस्यत्वाची मुदत नुकतीच संपली आहे. भाजपमध्येच असलेले माजी आमदार भीमराव धोंडे देखील राजकारणात सक्रिय आहेत . या तिघांनांहि विधानसभा निवडणूक लढवायची आहेच. प्रश्न आहे तो महायुतीमध्ये ही जागा कोणाची आणि उमेदवारी कोणाला मिळणार ? लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी जामखेडमधील सभेत खुद्द देवेंद्र फडणवीसांनी आष्टीमधून सुरेश धस यांची विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर केली होती , तर नुकतेच अजित पवार बाळासाहेब आजबे यांना तुम्ही कामाला  लागा असे सांगून गेले आहेत. ओबीसींची मते निर्णायक असलेल्या या मतदारसंघात भीमराव धोंडेंनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला नुकतीच पंकजा मुंडेंनी हजेरी लावली. या साऱ्याच घटनांचे स्वतःचे असे अर्थ आहेत आणि त्या प्रत्येक घटनेला वेगवेगळे कंगोरे देखील आहेतच .
एकीकडे महायुतीमध्ये असे चित्र असताना महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे ही जागा असणार आहे. आजघडीला माजी आ. साहेबराव दरेकर हे या पक्षाचा चेहरा होऊ शकतात. दुसरीकडे इतरही  अनेकांना 'तुतारी ' हाती घेण्याची इच्छा आहे. ऐनवेळी महायुतीमधील कोणी शरद पवारांकडे जाऊ शकतो. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून ओळख असलेले तानाजी जंजिरे मागच्या काही काळात आष्टी मतदारसंघात सक्रिय झालेले आहेतच. त्यांनी अद्याप विधानसभेचा मनोदय जाहीर केलेला नाही, मात्र कधी नकार देखील दिलेला नाही. हे सारे असतानाच अमोल तरटे, प्रदीप चव्हाण असे काही तरुण चेहरे देखील 'हाबुक ' ठोकत आहेतच.

 

Advertisement

Advertisement