Advertisement

जिल्हा रुग्णालयासाठी माझं लातूर परिवाराची पालकमंत्री यांच्याशी निर्णायक चर्चा

प्रजापत्र | Tuesday, 03/09/2024
बातमी शेअर करा

लातूर दि.०३ (प्रतिनिधी)- प्रलंबित लातूर जिल्हा रूग्णालय हस्तांतरण निधी वर्ग करून त्वरित भूमिपूजन करावे अशी मागणी माझं लातूर परिवाराच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री गिरीष महाजन यांच्याकडे पुन्हा एकदा केली. उदगीर येथे नियोजित राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत होत असलेल्या सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी ते लातूर विमानतळावर उतरले होते.
लातूर जिल्हा रुग्णालय उभारणीसाठी शासनाने जागा हस्तांतरण करण्यास मंजुरी दिलेली आहे. यासाठी लागणारा मोबदला रुपये ३ कोटी ३२ लाख ६८ हजार ६५० रुपये कृषी विभागास देण्याची तरतूद देखील केली आहे. मात्र अद्याप यासाठीचा निधी आरोग्य विभागाने कृषी विभागास वर्ग केलेला नाही. हा निधी त्वरीत वर्ग करून लातूरच्या प्रलंबित आणि मंजूर असलेल्या जिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन करून लातूरकरांना उपकृत करावे अशी विनंती यावेळी करण्यात आली. हा निधी वर्ग करून ६० दिवसांच्या आत जिल्हा रूग्णालय हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे असा शासन आदेश (१९ जून २०२४) आहे. याची मुदत  १९ ऑगस्ट २०२४ रोजी संपली आहे.

 

गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न शासनाने मार्गी लावावा यासाठी माझं लातूर परिवाराने निर्णायक लढा दिला आहे. ऐतिहासिक साखळी उपोषण, मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री यांना विनंती केली होती.
जिल्ह्याचे पालकमंत्री  म्हणून आपण हा प्रश्न त्वरित मार्गी लागेल यासाठी त्वरीत निर्देश द्यावेत असा हट्ट 
माझं लातूर परिवाराच्या शिष्टमंडळाने केला. या विषयाचे गांभीर्य ओळखून महाजन यांनी राज्याचे मुख्य आरोग्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याशी फोनवर संपर्क साधला आणि कुठल्याही परिस्थितीत निधी उपलब्ध करून तो कृषी विभागास वर्ग करावा असे आदेश दिले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनाही फोन करून निधी उपलब्ध होत नसेल तर विना मोबदला जमीन हस्तांतरण करून द्यावी अशी मागणी केली. असा प्रस्ताव आरोग्य विभागाने सादर करावा आम्ही विना मोबदला जमीन हस्तांतरण करून देऊ असे आश्वासन मुंडे यांनी दिल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, तहसीलदार सौदागर तांदळे यांची उपस्थिती होती.
एकूणच या विषयावर लातूरच्या नागरिकांतून वाढत चाललेला रोष आणि दबाव पाहता येत्या काही दिवसात हा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास माझं लातूर परिवाराने व्यक्त केला आहे. शिष्टमंडळात डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर, सतीश तांदळे, दिपरत्न निलंगेकर, अभय मिरजकर, डॉ सितम सोनवणे, डॉ.जुगलकिशोर तोष्णीवाल, काशिनाथ बळवंते, उमेश कांबळे, गोपाळ झंवर, संजय स्वामी यांचा समावेश होता
.

Advertisement

Advertisement