Advertisement

 पंजाबराव डख यांचेच सोयाबीनचे पीक गेले वाहून

प्रजापत्र | Monday, 02/09/2024
बातमी शेअर करा

मराठवाड्यात तुफान पाऊस कोसळत आहे. पुढील ३६ ते ४८ तास अतीवृष्टी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. असे असताना प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या शेतात पुराच्या पाण्याने थैमान घातले असून सोयाबीनचे पीक वाहून गेले आहे. 

पंजाबराव डख यांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी पिकेच नाहीत तर मातीही वाहून गेली आहे. शेतात साचलेले पाणी, खंगाळलेल्या जमिनी, आडवी पडलेली नवतीची पिके, फुटलेले बांध या मुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम गेला, त्यावर झालेला खर्चही वाया गेला आहे. 

 

पंजाबराव डख हे हवामानाचा अंदाज देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात. कधी पाऊस पडेल, किती पडेल, कोणते पीक घ्यावे आदी गोष्टी ते सांगत असतात. परंतू परभणीत झालेल्या मुसळधार पावसात सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथे पंजाबराव डख यांच्याही शेतातील पीक वाहून गेले आहे. डख यांच्या शेतातील १७ एकरावरील सोयाबीनचे पीक वाहून गेले आहे. प्रशासनाने आता पंचनाम्यात वेळ खर्च न करता शक्य तेवढ्या लवकर शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. अशी मागणी आता शेतकरी व्यक्त करीत आहे. नांदेडमध्ये पूर परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे. 

 

 

विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. यवतमाळ जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडतो आहे. यवतमाळ जिल्ह्यातील १३ तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने घरे, शेती यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच जनावरे देखील वाहून गेली आहेत. शेतात पुराचे पाणी शिरल्याने पिके पाण्याखाली गेली होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले पिकं त्यांच्या डोळ्यादेखत जमीनदोस्त झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे.

Advertisement

Advertisement