छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ४२० महसूल मंडळपैकी २८४ महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने शेतामध्ये पाणी साठले आहे. नदी नाल्यांना पूर आले असून लातूर जिल्ह्यात ढोरसावंगी येथे नरेश अशोक पाटील या तरुणाचा वाहून गेल्याने मृत्यू झाला. तर बीड व हिंगोलीमध्येही जिल्ह्यातही वाहून गेल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. पुराच्या पाण्यात रविवारी रात्रीपासून छोटी – मोठी ८० जनावरे वाहून गेल्याने दगावली आहेत. २१ पक्की घरे तर ११६ कच्च्या घरांची पडझड झाली असून परभणी, हिंगोली, नांदेड, बीड जिल्ह्यातील अनेक गावात पाणी शिरले असल्याचे वृत्त आहे. गोदावरी नदीतून जायकवाडी धरणात येणाऱ्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कोणत्याही क्षणी जायकवाडीतून पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे नदी काठच्या १०० गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
रविवारी रात्रीपासून पावसाची जोरधार कायम आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४७ महसूल मंडळात अतिवृष्टी नोंदण्यात आली. त्यामुळे वहिरी काठोकाठ भरल्या आहेत. नदी नाल्यांना पूर आले आहेत. अजिंठा- वेरुळ लेणींवरील धबधबे पुन्हा जोरधारेसह कोसळू लागले आहेत. सिल्लोड, फुलंब्री भागातील विहिरींमध्ये तुडुंब भरल्या आहेत. अनेक भागात शिवारात पाणी साठल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पैठण तालुक्यातील नांदर महसूल मंडळात १४९ मिलीमीटर पाऊस नोंदण्यात आला. तर पाचोड परिसरात १९० मिलीमीटर पाऊस नोंदण्यात आला. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जायकवाडी धरणातूनही पाणी सोडावे लागेल अशी स्थिती नाही.
नगरमध्ये पाऊस आहे. पण नाशिकमधील धरणांमधील पावसाचा जोर कमी झाल्याने जायकवाडीतून पाणी लगेच पाणी सोडावे लागेल अशी स्थिती नाही. मात्र, गोदावरी नदीवरील आपेगाव, हिरडपुरी, राजाटाकळी , मुदगल, लोणी सावंगी यासह विविध उच्च पातळी बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. दरम्यान जायकवाडी धरणात आजही २५ ते ३० हजार क्युसेक वेगाने पाणी येत आहे. त्यामुळे धरण ९५ टक्के भरल्यानंतर पाणी सोडायचे, की नाही याबाबतचे निर्णय घेतले जातील, असे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार यांनी सांगितले. जायकवाडी धरण आता ८७ टक्के भरले असून मनार धरण शंभर टक्के भरले आहे. आणखी दोन दिवस पाऊस पडू शकतो असा हवामान विभागाचा अंदाज असल्याने यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.