नागपूर - एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी एसटी कर्मचारी मंगळवारी, (दि.३) राज्यभऱ्यात धरणे आंदोलन करणार आहेत. यादरम्यान ‘लालपरी’ची चाके थांबण्याची शक्यता आहे. आंदोलन तीव्र झाल्यास ऐन सणासुदीत कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)च्या आजी-माजी कर्मचाऱ्यांनी ‘महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती’ स्थापन केली आहे. एसटीच्या सर्व कामगार संघटना कृती समितीच्या माध्यमातून जोडल्या गेल्या आहेत.
राज्यभरात बैठकांचे सत्र राबवून ३ सप्टेंबरला आंदोलन करण्याचा निर्धार कृती समितीच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
चालक-वाहक, यांत्रिक कर्मचाऱ्यांसह इतर कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार असल्याने या दिवशी राज्यभरात ‘लालपरी’ची चाके थांबण्याची शक्यता कृती समितीकडून वर्तविण्यात येत आहे. त्याचा परिणाम बस वाहतुकीवर होऊन गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांना फटका बसू शकतो.
मुख्यमंत्र्यांना आंदोलनाचे पत्र
कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन ३ सप्टेंबरला धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे कळविले आहे. कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत ७ ऑगस्ट रोजी बैठक झाली होती. त्यात विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र, अद्यापही तोडगा निघाला नसल्याचे कृती समितीकडून कळविण्यात आले आहे.
‘या’ आहेत प्रमुख मागण्या
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे
जुलै २०१८ ते जानेवारी २०२४ या काळातील प्रलंबित महागाई भत्ता देण्यात यावा
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ लागू करावी
वेतनवाढीच्या ४,८४९ कोटी रुपयांची शिल्लक रक्कम कामगारांना वाटप करावी
सेवाज्येष्ठ कामगारांच्या मूळ वेतनातील विसंगती दूर करावी, सरसकट ५ हजार द्यावे
वैद्यकीय सेवेसाठी कॅशलेश योजना कामगारांना लागू करण्यात यावी
कर्मचारी व कुटुंबीयांना एसटीत फरक न करता मोफत पास सवलत द्यावी.