Advertisement

पचनी पडेना इव्हेंटवाला 'गुलाबी' दादा...

प्रजापत्र | Monday, 02/09/2024
बातमी शेअर करा

बीड: अजित पवार म्हणजे राज्यातलं एक करारी नेतृत्व, रोखठोक दादा. कोणाचा मुलाहिजा न राखणारं, जे वाटतय ते स्पष्ट बोलणारं, त्यासाठी त्यांना  भलेही 'आत्म क्लेषा'ची वेळ देखील आली, पण दादांची 'रोखठोक' ओळख कधी बदलली नाही. तेच रोखठोक दादा आता मात्र इव्हेंट एजन्सीच्या इशाऱ्यावर 'गुलाबी' झाले आहेत. मात्र त्यांचं हे गुलाबीपण मतदारांना पचनी पडत नसल्याचे चित्र आहे. 

अजित पवारांच्या विधानसभा निवडणुकीच्या नियोजनाची जबाबदारी यंदा एका इव्हेंट कंपनीवर आहे. त्यासाठी म्हणे कंपनीला शेकडो कोटी मिळणार आहेत, अर्थात आपल्याला त्याच्याशी देणे घेणे नाही, मुद्दा आहे तो वेगळाच. या कंपनीने म्हणे दादांचा लुकच बदलून टाकला. आख्खा पक्ष 'गुलाबी' रंगात रंगविण्याचा सल्ला दिला आणि 'रोखठोक' दादांनिही त्या सुचनेसमोर चक्क मान तुकवली. इतकी की कधी नव्हे ते दादा गुलाबी जॅकेट घालून हिंडू लागलेत. ज्या अजित दादांसमोर जाताना पक्षाचे आमदारही घाबरायचे ते दादा भलतेच मवाळ झालेत. आता ते गर्दीत जाऊन हस्तांदोलनं देखील करतायत, इतकच काय 'लाडक्या बहिणीं'कडून ठिकठिकाणी राख्या बांधून घेतायत.(यातं वावगं असं काही नाही, पण हा दादांचा स्वभाव नव्हता), त्यांच्या सभेत सगळीकडे गुलाबी झेंडे, (आता हा रंग पाहण्याची महाराष्ट्राला सवयच नाही, दुसरीकडे हा रंग तेलंगणातही फेल गेलेला), ते कुठे लावायचे हे देखील इव्हेंटवालेच ठरविणार, त्यामुळे कार्यक्रमांचे स्थानिक आयोजक देखील परेशान.दादांच्या भाषणावरही कदाचित या रंगाचा परिणाम झालेला, त्यामुळे त्यातली आक्रमकता हरवलेली. मग मतदारांना हा 'गुलाबी' दादा पचावा तरी कसा? 

सहज म्हणून एक गोष्ट आठवली. आटपाट नगरातली. एकदा जंगलातला एक वाघ चुकून शहरात आला. त्या वाघाला एका राजकन्येने पाहिले. वाघाचं ते राजबिंड रुपडं आणि राजकन्येचं लावण्य... झालं दोघही एकमेकांच्या प्रेमात पडले. भल्या 'पहाटे' प्रेमाच्या गुजगोष्टी झाल्या, एकत्र राहण्याच्या 'शपथा' घेतल्या गेल्या. पण राजकन्येला प्रश्न पडला, वाघाचे ते सुळे, ती तीक्ष्ण नखं... आपला संसार चालावा तरी कसा? आता राजकन्येचाच हट्ट, प्रेमात पडलेल्या वाघाला पुरवावाच लागणारं, दुसऱ्याच दिवशी वाघाने सुळे काढले, नखं कापून टाकली, अगदी राजकन्येला टोचू नयेत म्हणून मिशाही काढल्या... चला आता 'सुखाचा संसार' म्हणत वाघ दादा राजकन्येला भेटायला आला, पण राजकन्येला तो ओळखताच येईना, 'अरे मी भाळले होते तुझ्यातल्या वाघपणाला, आता ना सुळे, ना नखं, नुसत्या फेंदारल्यातरी जंगल घाबरेल अशा मिशाही उरल्या नाहीत, मग मी प्रेम करावं तरी कशावर?' असं म्हणत राजकन्या निघून गेली. आता आटपाट नगरातली ही गोष्ट आपल्या 'गुलाबी दादा'ला सांगायची तरी कोणी? 

Advertisement

Advertisement