Advertisement

 छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मविआचं जोडे मारो आंदोलन

प्रजापत्र | Sunday, 01/09/2024
बातमी शेअर करा

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या घटनेने महाराष्ट्र हळहळला. २६ ऑगस्टला ही घटना घडली. ज्यानंतर सरकावर आरोपांच्या फैरी झाडण्यात आल्या. आता याच घटनेचा निषेध म्हणून मुंबईत जोडे मारो आंदोलन करण्यात येतं आहे. महाविकास आघाडी या प्रकरणी आक्रमक झाली आहे. तुरुंगात टाकलं तरीही चालेल पण आंदोलन होणारच असा पवित्रा महाविकास आघाडीने घेतला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा स्वाभिमान… त्यांचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही, असं म्हणत महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरलं आहेत. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष केला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असं म्हणत शेकडो कार्यकर्ते गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना झाले. तसंच गद्दारांना माफी नाही, शिवद्रोहींना माफी नाही अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

 

आधी परवानगी नाकारली, नंतर बॅरिगेट्स हटवले
मविआच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. मात्र आज रविवारचा दिवस आहे. या भागातील कार्यालयांना सुट्टी आहे. असं असताना आमच्या आंदोलनाला परवानगी का नाही? असा सवाल महाविकास आघाडीने केला. त्यानंतर हा मोर्चा अडवला जाणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. लावलेले बॅरिगेटही हटवण्यात आले आहेत. हा मोर्चा आता गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना झाला. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले आहेत.

Advertisement

Advertisement