Advertisement

पुढच्या पाच वर्षात महिलांच्या खात्यात १ लाख जमा करू

प्रजापत्र | Saturday, 31/08/2024
बातमी शेअर करा

भावाच्या नात्यानं तुम्ही जी राखी मला बांधलीय त्या अनुषंगाने तुमचं संरक्षण करणं हे माझं एक भाऊ आणि सरकार म्हणून कर्तव्य आहे. राज्यातील अडीच कोटी महिलांना १५०० रुपये महिना त्यांना सक्षम करण्यासाठीचा निर्णय आम्ही घेतलाय. त्यातून दोन कोटी महिलांच्या खात्यात १५०० रुपये टाकण्याचा निर्णय घेतलाय. अजित दादा शब्दाचा पक्का आहे. त्यामुळे पुढच्या पाच वर्षात लाडकी बहीण योजनेतून महिलांच्या खात्यात १ लाख रुपये जमा होईल. अशी मोठी घोषणा राज्याचे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

 

 

अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघात आली आहे. दरम्यान, काटोलच्या कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांनी लाडक्या बहि‍णींशी आणि शेतकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सरकारच्या वतीने अनेक आश्वासनांचा पाऊस पाडला. काटोल हा माजी गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांचा मतदारसंघ असून अजित पवार गट काटोलच्या जागेसाठी आग्रही असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यासाठीच अजित पवार यांनी जन सन्मान यात्रा काटोल विधानसभा मतदार संघात ठेवली आहे. मात्र दुसरीकडे भाजप पण काटोलच्या जागेसाठी आग्रही असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे अनिल देशमुखांच्या बालेकिल्ल्यात आज अजित पवार यांची तोफ कडाडली असल्याने या जागेवर त्यांच्या पक्षाने एकप्रकारे शड्डू ठोकला असल्याचे बोलले जात आहे.

 

 

संत्रा उत्पादक शेतकर्‍यांसाठी काटोलला कारखाना देणार- अजित पवार
नागपूर जिल्ह्यातील काटोलच्या कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित कार्यक्रमात अजित पवार पुढे बोलताना  म्हणाले की, शेतकऱ्यांनी वीज बिलाचे टेन्शन घेऊ नये. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात आले आहे. सोबतच ज्या शेतकऱ्यांचे जुने बील थकीत आहे त्यावरही विचार सुरु आहे. शेतकऱ्यांना प्रतिलिटर 5 रुपये दुधात अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काटोलला कारखाना देणार असल्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

 

 

लाडकी बहीण योजनेत ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, त्यांनी फॅार्म भरा. त्यासाठी राष्ट्रवादीने हेल्फलाईन दिलीय त्यांची मदत घ्या. महिला, शेतकरी, कष्टकरी लोकांना मदत व्हावी म्हणून अनेक योजना सरकारने आणल्या आहेत. काटोल इथे पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन केलंय. लोकं त्याला चांगला प्रतिसाद देतोय. तब्बल ४६ हजार कोटी आम्ही लाडकी बहिण योजनेवर खर्च करणार आहोत. त्यात डायरेक्ट पैसे खात्यात देतोय, त्यात कुठलीही मध्यस्थी नाही. विधानसभा निवडणूक झाल्यावर महायुतीचं सरकार येणार आहे. माय माऊलीं आम्हाला निवडून देणारच आहेत. तर पुढे पाच वर्षात लाडकी बहीण योजनेतून महिलांच्या खात्यात १ लाख जमा करू असेही अजित पवार म्हणाले. 

 

Advertisement

Advertisement