दिल्ली- राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर मार्शल आर्टचा व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडीओमुळे त्यांच्या फिटनेसच्या चर्चा झाल्या. याशिवाय या व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय संदेश देण्याचे कामही राहुल गांधींनी केले. भारत जोडो यात्रा लवकरच काढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. म्हणजेच राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेचा तिसरा भाग लवकरच सुरू होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राहुल गांधींची ही भारत जोडो यात्रा सुरू होणार आहे.
यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याचे नियोजन सुरु
भारत जोडो यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याचे नियोजन सुरु झाले आहे. त्यासाठी यात्रा मार्गाचा नकाशा तयार करण्यात येत आहे. त्यांच्या यात्रा मार्गामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचा पूर्ण विचार केला जाईल. सर्व तयारी झाल्यानंतर यात्रेची औपचारिक घोषणा केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राहूल गांधींनी आपल्या उर्जेचे रहस्यही सांगितले. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान हजारो किलोमीटरचा प्रवास केला, तेव्हा रोज संध्याकाळी शिबिराच्या ठिकाणी जिउ-जित्सूचा सराव करणे हा दिनक्रम झाला असल्याचे त्यांनी सांगितले. भारत जोडो यात्रे दरम्यान, ज्या शहरात मुक्काम झाला तिथे सहप्रवासी आणि तरुण मार्शल आर्ट विद्यार्थ्यांना एकत्र आणून सराव केल्याचे गांधी यांनी सांगितले.हा व्हिडिओ जारी करताना शेवटी त्यांनी भारत जोडो यात्रा लवकरच सुरु होणार असल्याचे सांगितले.
चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका
यंदा हरियाणा, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र आणि झारखंड या चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील वर्षी दिल्ली आणि बिहारमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. २०२६ च्या मार्च ते मे या कालावधीत पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, पुडुचेरी, केरळ या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या तिसऱ्या भागात या सर्व राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रोड मॅप तयार करण्यात येणार आहे. या वर्षी होणाऱ्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका काँग्रेससाठी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. या ठिकाणी काँग्रेस सत्तेत येण्याची आशा बाळगून आहे. त्यासाठी ही यात्रा असल्याचे सांगितले जात आहे.