Advertisement

नांदेडमध्ये कॉंग्रेसला पुन्हा धक्का! आमदार जितेश अंतापूरकरांचा पक्षाला रामराम

प्रजापत्र | Friday, 30/08/2024
बातमी शेअर करा

  महाराष्ट्रातील देगलूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी आपल्या पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. आज (शुक्रवारी) रात्री भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच विधिमंडळानेही राजीनामा स्वीकारत गॅजेट काढून घेतले आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून जितेश अंतापूरकर आणि काँग्रेसचे अन्य काही आमदार पक्ष नेतृत्वाच्या रडारवर असल्याची चर्चा होती. विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यात अंतापूरकर यांच्या नावाचाही समावेश होता. तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट न दिल्याच्या भीतीने अंतापूरकरांनी हे पाऊल उचलल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांमध्ये अंतापूरकर यांचा समावेश असल्याचा संशय काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केल्याने आगामी निवडणुकीत त्यांना तिकीट न देण्याचा निर्णय पक्षनेतृत्वाने घेतला होता. यानंतर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

 

 

कोण आहे जितेश अंतापूरकर?
जितेश अंतापूरकर २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत देगलूर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विजयी होऊन आमदार झाले. त्यांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत काँग्रेस पक्षावर निष्ठा दाखवली आणि आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी समर्पित राहिले. अंतापूरकर यांनी पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्यसेवा, समाजकल्याण या प्रश्नांकडे विशेष लक्ष दिले. त्यांच्या मतदारसंघातील लोकांशी असलेली जवळीक आणि संवाद कौशल्य हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

दरम्यान अलीकडेच अंतापूरकर आणि हिरामण खोसकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतल्याची बातमी आली होती. मात्र, या भेटीबाबत त्यांना विचारले असता त्यांनी काँग्रेस सोडल्याच्या वृत्ताचे खंडन केले होते. आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आता त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले असून ते आज रात्री वाजता भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Advertisement

Advertisement