Advertisement

चार महिन्यापूर्वीच्या रस्त्यावरील खड्डे मातीने भरण्याची 'मस्क'री

प्रजापत्र | Wednesday, 28/08/2024
बातमी शेअर करा

बीड : चार महिन्यापूर्वी म्हणजे मार्च- एप्रिल महिन्यामध्ये नेकनुर ते कळसंबर फाट्यापर्यंत झालेल्या डांबरी रस्त्याची चार महिन्यातच अक्षरशा खड्ड्यांनी चाळण होऊन त्यावरील डांबर निघून गेल्याने रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडल्याचे वृत्त 'प्रजापत्र' ने प्रसिद्ध केले होते. यावृत्तानंतर आता एका राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या गुत्तेदाराला जाग आली आहे. मात्र त्या रस्त्यावरील खड्डे मातीने भरण्याची 'मस्क'री सध्या सुरु आहे. संबंधित यंत्रणा याकडे लक्ष देणार का आणि सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी याचा जाब विचारणार का हा प्रश्न या भागातील जनतेला पडला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी नेकनूर ते बार्शी नाका बीड पर्यंतचा डांबरी रस्ता गुत्तेदाराने केला. चार महिन्यापूर्वी डांबरी रस्ता अगदी 'मस्का ' मारल्यासारखा चकाचक दिसल्याने वाहनधारकांमधून आनंद व्यक्त करण्यात येत होता. परंतु पावसाळ्याला सुरुवात झाली की लगेचच त्या रस्त्यावरील डांबर निघून अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने अक्षरशा त्या रस्त्याची चाळण झालेली पाहावयास मिळत आहे. या रस्त्याचा देखभाल दुरुस्तीचा कालावधी फार मोठा आहे, त्या अगोदरच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचे वृत्त 'प्रजापत्र 'ने प्रसिद्ध केले होते.

 

 

या रस्त्याचे काम करणारे कंत्राटदार सत्ताधारी पक्षाशी संबंधित असून बड्या नेत्यांना 'मस्का ' मारून आपला कार्यभाग साधण्यात पटाईत असल्याचे सांगण्यात येते. त्यांनी आता रस्त्यावरील खड्ड्यांचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर थेट जनतेसोबतच 'मस्करी' सुरु केली आहे. डांबरी रस्त्यावरील खड्डे बौजविण्यासाठी चक्क मातीचा वापर केला जात आहे. त्यामुळे या मातीचे पावसात काय होईल हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. सध्या महायुतीच्या सत्ताकाळातील कामांचा दर्जा मालवण घटनेतून समोर आला असतानाच आता सामान्यांसाठी महत्वाच्या असणाऱ्या रस्त्यांच्या संदर्भाने 'राज'कारणाशी संबंधित असणारे लोक कशी 'मस्करी ' करतात हेच समोर येत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सत्ताधारी पक्षाचे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी याचा जाब विचारणार आहेत का ?

 

 

 

Advertisement

Advertisement