Advertisement

परीक्षा केंद्रावर उमेदवारांना मागितले लग्नाचे पुरावे

प्रजापत्र | Tuesday, 27/08/2024
बातमी शेअर करा

वैद्यकीय  शिक्षण आणि संशोधन विभागाच्या वतीने वर्ग चार संवर्गासाठी पदभरती सुरु आहे. सोमवारी नागपूर येथील परीक्षा केंद्रावर विवाहित महिला उमेदवारांना त्यांच्या लग्नाचे पुरावे मागण्यात आले. ज्या महिलांकडे पुरावे नव्हते त्यांना परीक्षेपासून वंचित राहावं लागलं आहे.वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या वतीने शासकीय, आयुर्वैदिक, दंत महाविद्यालायसाठी गट संवर्गातील ६८० पदांची भरती सुरु आहे. सोमवारी यासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. या पदभरतीसाठी जवळपास ९५ हजार अर्ज आले होते.

 

 

नागपूरमध्ये सुमारे २५ हजार उमेदवार असल्याने दहा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली. यात वाडी येथील केंद्रावर काही महिलांनी लग्नानंतर बदललेल्या नावाचे आवश्यक कागदपत्र सोबत आणले नव्हते. त्यामुळे त्या महिला उमेदवारांना केंद्रातून बाहेर काढण्यात आले. या महिलांनी केंद्राच्या बाहेर गोंधळ घालत परीक्षा प्रक्रियेवरच आक्षेप घेतला.

दुसरीकडे महिला उमेदवारांनी आमच्याकडे पुरावे असल्याचं सांगून एका व्हिडीओच्या माध्यमातून ते पुरावे दाखवले आहेत. काहींकडे दोन्ही नावाचे आयडी कार्ड होते तर काही उमेदवार महिलांकडे मॅरेज सर्टिफिकेट होतं. तरीही त्या उमेदवारांना परीक्षेसाठी डावलण्यात आलेले आहे. आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी उमेदवारांनी केलीय.

Advertisement

Advertisement