सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. या घटनेनंतर शिवप्रेमी तसेच विरोधकांकडून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे सरकार शिवाजी महाराजांच्या विचाराचं सरकार नाही, ते सतत महाराजांचा अपमान करत असतात, अशी टीका केली आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर बोलताना त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
नाना पटोले म्हणाले, "हे लोक छत्रपती शिवाजी महाराज यांचा सतत अपमान करत आले आहेत. हे सरकार कमीशनखोर आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांचं हे सरकार नाही. १ रुपयांची वस्तू १० रुपयांत विकत घेतली जाते. मूर्तिकारांचा अनुभव नसताना सुध्दा मूर्तीच काम दिलं.२३६ कोटी मूर्ती बनवायला आणि ५ कोटी रुपये सुशोभीकरण करायला खर्च केला आहे. राज्य सरकार म्हणते की, आमचा दोष नाही केंद्र सरकारचा दोष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तर छत्रपतींचा अपमान करायला उठले आहेत. भाजप शिवाजी महाराजांचा अपमान करत आहे.
राज्य सरकारवर FIR दाखल करण्यासाठी डीजीपींना पत्र देणार आहे. मोदी ज्याला हात लावतात ते खराब होत आहे. अधिकारी किंवा कंत्राटदार यांचा दोष नसून राज्य सरकारच दोषी आहे. सरकारने स्वतः माफी मागून पायउतार व्हावं, अशी शब्दात पटोले यांनी हल्लाबोल केला.
राज्यात महिला सुरक्षित नाहीत. गुन्हेगारांवर लगाम नाही. मुंबई-गोवा महामार्गावर पाहणी करून किती मलिदा खायचा याची पाहणी करण्यासाठी ते गेले होते, असं म्हणत पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. बदलापूरमधील घटना झाली त्यामध्ये आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. पोलिस बघ्याच्या भूमिकेत असून गुंड लोकांना वाय प्लस सुरक्षा दिली जात असल्याचा आरोपही पटोले यांनी केला.