मालवण : नौदल दिनानिमित्त राजकोट येथे आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा आज मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे कोसळला. ही घटना दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेची माहिती मिळताच शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली. तहसीलदार, पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. तहसीलदार वर्षा झालटे यांनी या घटनेची माहिती नौदल विभागाला कळविण्यात आले असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, आमदार वैभव नाईक यांनी राजकोट येथे भेट देत पाहणी केली. आठ महिन्यातच पुतळा कोसळला ही दुर्दैवी बाब असून या घटनेचा आपण तीव्र निषेध करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत. त्यामुळे निकृष्ट काम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी केली. शिवप्रेमींनी शांतता बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले.४ डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त नौदल विभागाच्या वतीने राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला होता. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. हा पुतळा शिवप्रेमींसाठी आकर्षक ठरला होता.गेले दोन तीन दिवस किनारपट्टी भागात वादळी वारे व मुसळधार पाऊस सुरू आहे. यातच आज दुपारी वादळी वाऱ्यामुळे राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पायातून तुटून कोसळला. स्थानिकांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी यांची माहिती प्रशासनास दिली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक शिवप्रेमींनी राजकोट येथे धाव घेतली. तहसीलदार वर्षा झालटे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे हेही पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी संतप्त बनले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली आहे. पुतळ्याच्या ठिकाणी कोणालाही जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची माहिती मिळताच आमदार वैभव नाईक आपल्या पदाधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी भेट देत पाहणी केली.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आठ महिन्यांपूर्वी नौदल दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले होते. हे काम अत्यंत घाईने करण्यात आले. किल्ल्याचे काम करताना तो ढासळत असल्याच्या तक्रारीही शिवप्रेमींनी केल्या होत्या. मात्र, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. आज हा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे या प्रकाराचा आपण तीव्र निषेध करत आहोत.पुतळ्याचे बांधकाम करताना त्यात लोखंडाचा वापर झाल्याने ते गंजले आहे. त्यामुळे यात जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही दुर्दैवी घटना आहे. मात्र, शिवप्रेमींनी शांतता पाळावी. या घटनेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शिवप्रेमींनी राजकोट येथे गर्दी केली होती. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.