Advertisement

 परळी-बीड मार्गावरील पूल गेला वाहून

प्रजापत्र | Saturday, 24/08/2024
बातमी शेअर करा

 परळी दि.२४ (प्रतिनिधी)- बीड महामार्गावरील रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्यावरील पुलांची कामे पूर्ण न झाल्याने पर्यायी पूल तयार करण्यात आला होता. मात्र आज (दि.२४) पहाटेच्या सुमारास परळी-बीड रस्त्यावरील पांगरी जवळील पर्यायी पूल पाण्याने वाहून गेला. त्यामुळे बीड मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. 

 

 

   परळी बीड राज्य रस्त्यावर सध्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. परळी तालुक्यातील पांगरी जवळील वाण नदीवर असलेला मुख्य पूल काढून टाकण्यात आला असुन या ठिकाणी नवीन पूल निर्माण करण्याचे काम सुरू आहे. या पुलाचे काम पूर्ण झाले नसल्याने या ठिकाणी माती व मुरुमाचा भराव टाकून एक पर्यायी पूल तयार करून मार्ग तयार करण्यात आला होता. वाण नदीवर नागापूर येथे वाण धरण आहे. हे धरण १००% भरल्याने पाऊस झाल्यानंतर संपूर्ण पाणी हे नदीपात्रात येत आहे. काल (शुक्रवारी) मध्यरात्रीनंतर परळी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे वाण नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे. या पाण्याने पांगरी जवळील हा पर्यायी पूल वाहून गेला आहे. दुसरा पर्यायी मार्ग नसल्याने परळी ते बीड हा रस्ता आता बंद झाला आहे.
   दरम्यान, नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह काही प्रमाणात कमी झाल्यानंतर या ठिकाणी पुन्हा नव्याने नाल्या टाकून पर्यायी भरावाचा तात्पुरता पूल तयार करण्यात येणार आहे. पर्यायी पूल तयार झाल्यानंतरच हा रस्ता बीडकडे जाण्यासाठी तयार होणार आहे. तोपर्यंत मात्र वाहनधारकांचा खोळंबा होणार हे निश्‍चित आहे.

Advertisement

Advertisement