बदलापूर शहरातील एका शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मात्र या बंदविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीवेळी मुंबई हायकोर्टाने सदर बंद बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. राजकीय पक्षांना बंद पुकारण्याचा अधिकार नसून जे लोक बंद पुकारतील त्यांच्याविरोधात कारवाई करा, असे आदेश कोर्टाकडून देण्यात आले आहेत.
महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या नेत्यांनी राज्यातील जनतेला उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत हा बंद विकृती विरुद्ध संस्कृती, यासाठी आहे. हा बंद राजकारणासाठी नाही, असं म्हटलं आहे.
"दुपारी दोनपर्यंत कडकडीत बंद पाळा"
उद्धव ठाकरे यांनी आवाहन करताना म्हटलं आहे की, "हा बंद महाराष्ट्राच्या जनेतसाठी आहे. हा बंद महाविकास आघाडीचा बंद नाही तर सर्व जनतेचा बंद आहे. सर्वांनी या बंदात सहभागी व्हा तसेच उद्याचा बंद कडकडीत असावा. बंद काळात ज्या अत्यावश्यक सेवा आहे त्या चालू राहतील. दुपारी २ वाजेपर्यंत हा बंद पाळावा. दुकानदारांनाही उद्या बंद पाळावा," असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
"बदलापूर प्रकरणातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले पाहिजेत. नाहीतर आम्हाला उद्या रस्त्यावर उतरावं लागेल. आम्ही लाडकी बहीण योजनेच्या विरोधात नाही, पण सुरक्षित बहीण महत्त्वाची आहे. आता संतापचा कडेलोट होत आहे," अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे.दरम्यान, मुंबई हायकोर्टाकडूनच आता हा बंद बेकायदेशीर असल्याची टिपण्णी करण्यात आल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून काय भूमिका घेतली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.