बदलापूर प्रकरणी २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून ही बंदची हाक देण्यात आली आहे. यात आघाडीचे सगळे पक्ष सहभागी होणार आहेत. बदलापूर प्रकरणी महाविकास आघाडीच्या बैठकीत अशी चर्चा झाली आहे. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने (एमव्हीए) बुधवारी २४ ऑगस्ट रोजी दिवसभराच्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष दिवसभर चालणाऱ्या या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे एमव्हीएने म्हटले आहे. आदल्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बदलापूरमधील शाळकरी मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणाचा जलदगती तपास करून पीडितांना जलद न्याय मिळावा, अशी मागणी केली. ते म्हणाले, एकीकडे राज्य सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवत आहे, पण बहिणींच्या मुली सुरक्षित नाहीत.
मविआच्या बैठकीत, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गट या तीन पक्षांच्या नेत्यांनी बदलापूर घटना आणि राज्यातील एकूणच महिला आणि मुलींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा केली. यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्र बंदमध्ये मविआचे सर्व घटकपक्ष सहभागी होणार आहेत.
तर दुसरीकडे क्राइम ब्रँचच्या धर्तीवर महिला आणि मुलांसाठी विशेष शाखा असावी, अशी मागणी बालहक्क आयोगाने महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यास होत असलेला विलंब लक्षात घेऊन राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने महिला व बालकांसाठी गुन्हे शाखेच्या धर्तीवर विशेष शाखा स्थापन करण्याची शिफारस राज्य सरकारला केली आहे.