मुंबई, दि.२० (प्रतिनिधी): बांगलादेश आणि आजूबाजूच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात सध्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून या आठवड्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मराठवाड्यात मागील आठवड्यात रिमझिम हलका पाऊस झाल्याने धरण साठ्यात फार वाढ झाली नव्हती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यातजोरदार पाऊस सुरू झालाय.
पुढील पाच दिवस मराठवाड्यात सर्वदूर पाऊस राहण्याचा अंदाज देण्यात आलाय. पुढील दोन दिवस मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस होणार असून त्यानंतर दोन दिवस पावसाची विश्रांती असेल व त्यानंतर पुन्हा एकदा सर्व दूर पाऊस होण्याची शक्यता आहे, असे प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवले. मराठवाड्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. ओढे नाले ओसंडून वाहत असून धरण साठ्यातही वाढ होत आहे. दिनांक २१ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, धाराशिव, बीड, परभणी, लातूर व नांदेड जिल्हयात तर दि. २२ ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली जिल्हयात तुरळक ठिकाणी बादळी वारा, मेघगर्जना, बिजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता.