Advertisement

शिवसंग्राम विधानसभेच्या ५ जागा लढवणार

प्रजापत्र | Sunday, 18/08/2024
बातमी शेअर करा

पुणे दि.१८ (प्रतिनिधी)- राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात झाली आहे. महायुती अन् महाविकास आघाडीबरोबरच मनसे, वंचित बहुजन आघाडी, व इतर घटक पक्षही या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीसुद्धा सरकारला अल्टिमेटम देत विधानसभा लढविण्याचे संकेत दिले आहेत. अशातच शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक दिवंगत विनायक मेटे  यांच्या पत्नी ज्योती मेटेही स्वतः विधानसभा लढवणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

 

पुण्यात आज शिवसंग्राम पक्षाची सर्वसाधारण सभा पार पडली. सभेत शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्ष म्हणून ज्योती मेटे यांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील सर्व सभासद या सभेला उपस्थित होते. आगामी काळातील राजकीय भूमिका काय यावर चर्चा झाली. तसेच नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

 

ज्योती मेटे म्हणाल्या, शिवाजी महाराज स्मारक आणि मराठा आरक्षण यावर सभेत चर्चा झाली असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक आणि कायदेशीर मराठा आरक्षण हे कोणी देईल. आम्ही त्यांच्यासोबत जाणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांशी आमची चर्चा सुरू आहे. या विधानसभेला शिवसंग्राम किमान ५ विधानसभा जागा लढवणार आहे. मुंबई, कोकण. विदर्भ मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र पाच विभागात पाच जागा पाहिजेत. मी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून सध्या बीड मधून चाचपणी सुरू आहे. आम्हाला निवडणुका ज्या ठिकाणी जिंकेल असं वाटत त्याच ठिकाणी आम्ही लढवणार आहोत.

Advertisement

Advertisement