मुंबई- विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. प्रत्येक पक्षाकडून बैठका, मेळावे आणि उमेदवारांची चाचपणी सुरु झालेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारने तगडी खेळी खेळली आहे.
महाविकास आघाडीच्या परवा झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी कुणाच्याही नावाची तयारी असल्याचं म्हटलं असून आधी नाव जाहीर करा, असं म्हटलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी तयारीला लागल्याचं दिसतंय.
भाजपच्या ऑपरेशन लोट्सनंतर राज्यात २०१९ मध्ये महाविकास आघाडीच स्थापना झाली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून नवा प्रयोग केला. मुख्यमंत्री म्हणून महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे होते. महाविकास आघाडीने २०१९मध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही महिवकास आघाडीने भाजपला जोरदार धक्का देत ४८ पैकी ३१ जागांवर विजय मिळवला. या विजयामुळे महाविकास आघाडी आणि पर्यायाने उद्धव ठाकरेंचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे त्यांचं संपूर्ण लक्ष येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांकडे आहे. ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर दावा करु शकतात, परंतु सध्या तिन्ही पक्षांची अंतर्गत स्थिती म्हणावी तेवढी बरी नाही.
महाविकास आघाडीमध्ये सध्या वेगाने समीकरणं बदलत आहेत. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागांवर निवडणूक लढवून देखील उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे कमकुवत म्हणून बघितलं जातंय. लोकसभेत काँग्रेसने १७ पैकी १३ जागांवर विजय मिळवला, शरद शरद पवारांच्या गटाने १० पैकी ८ जागांवर विजयम मिळवला. ठाकरेंच्या पक्षाने मात्र २१ पैकी ९ जागांवर यश मिळवलं.
अशा परिस्थितीमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनतील का? असा प्रश्न उपस्थित होतोय. काँग्रेसने केलेल्या अंतर्गत सर्व्हेक्षणानुसार महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंची लोकप्रियता कमी होत चालली आहे. त्यातच ठाकरेंनी दिल्लीत काँग्रेस नेतृत्वाची भेट घेऊन मुख्यमंत्री पदाच्या फॉर्म्युल्यात बदल करण्याची मागणी केल्याचं कळतंय. त्यांच्या म्हणण्यानुसार सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाला मुख्यमंत्रीपद दिल्यामुळे आघाडी कमकुवत होते.
उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या दावेदारीवरुन महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचं म्हटलं जातंय. जर त्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित केलं तर भाजपकडून जोरदार हल्ला होण्याची शक्यता आहे. विशेषतः हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन. अशी परिस्थिती काँग्रेस आणि शरद पवारांसाठी अडचणीची ठरु शकते.