Advertisement

बर्ड फ्ल्यूचा अंड्यांनाही मोठा फटका

प्रजापत्र | Friday, 15/01/2021
बातमी शेअर करा

बीड दि.१५ (प्रतिनिधी)-कोरोनाचे सावट दूर होते की नाही तोच राज्यात बर्ड फ्लूने हाहाकार माजविणे सुरु केले आहे.बुधवारी (दि.13) एका दिवसांत राज्यात 238 पक्षी मृत पावल्याने कोंबड्या आणि अंड्याचे दर चांगलेच कोसळले असल्याचे चित्र आहे.बीडमध्ये शंभर अड्ड्याच्या कॅरेटमागे सव्वाशे ते दीडशे रुपयांपर्यंत घसरण झाली असून ऐन हिवाळ्यात अंड्यांचे दर घटल्याने व्यापार्‍यांवर ‘संक्रात’ आली आहे.
      मागील 15 दिवसांपासून राज्यात बर्ड फ्लूने चांगलेच डोके वर काढले.पाहता पाहता राज्यातील कानाकोपर्‍यात बर्ड फ्लूचा धोका पोहचला असून 8 जानेवारीपासून आतापर्यंत 2096 पक्षांच्या मृत्युची नोंद पशुसंवर्धन विभागाकडे करण्यात आली आहे. तर परभणी तालुक्यात सर्वाधिक पक्ष्यांच्या मृत्युची नोंद झाली असून परभणी हा हॉटस्पॉट केंद्र बनला आहे. एकट्या परभणी तालुक्यात 800 कोंबड्या बर्डफ्लूमुळे दगावल्या असून बीड जिल्ह्यात ही कोंबड्या,कावळे आणि पक्षांची मृत्युचे सत्र सुरुच आहे.बर्ड फ्लू या आजाराची धास्ती अनेकांनी घेतली असून पशु संवर्धन विभाग जनजागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करीत आहे.मात्र असे असले तरी लोकांनी धास्ती घेतल्याने सध्या बीडमध्ये कोंबड्यासोबत अंड्याचे दर ही कोसळू लागले आहेत.सध्या 400 रुपयांना 100 अंड्याचे कॅरेट देण्यात येत असून हिवाळ्यात हा दर 530 ते 550 रुपयांच्या घरात असतो.मात्र आता बर्ड फ्ल्यूमुळे सव्वाशे ते दीडशे रुपयांचा दर कोसळला असल्याने  ऐन हिवाळ्यात व्यापार्‍यांवर ’संक्रात’ आली आहे.

 

किमान नवं वर्ष तरी आशादायी राहिलं असं वाटलं होत
2019 वर्षातील सुरुवातीचे दोन महिने चांगले गेले.त्यानंतर मार्चपासून धंद्याला कोरोनाचे ग्रहण लागले.एप्रिलपासून ऑक्टोबरपर्यंत धंद्यात मोठी आर्थिक झळ सोसावी लागली.अगदी कोंबड्याची मोफत विक्री केली.अंडे ही एक रुपयाला दिले.आयुष्यातील तो सर्वात कठीण काळ होता.नोव्हेंबरच्या सुरुवातीला थोडे फार आशादायी चित्र निर्माण होऊ लागले.हिवाळ्याला सुरूवात झाल्याने आणि कोरोनाची भीती कमी झाल्याने मागणी वाढू लागली.त्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर व्यवसाय पूर्ववत झाला.मात्र पुन्हा नवं वर्षाच्या सुरुवातीपासूनच बर्ड फ्लूने डोके वर काढले.तेरा महिन्यात केवळ चार महिने चांगला धंदा झाला. नवं वर्ष आशादायी होते मात्र बर्ड फ्लूने सर्व स्वप्नावर पाणी फिरवले आहे.पुढील किती काळ आव्हानात्मक राहिलं हे कळेनासं झालं आहे.      
बशीर हकीम(चिकन,अंडे, ठोक विक्रेते,बीड)

 

हिवाळ्यात पहिल्यांदाच  घटली मागणी
बर्ड फ्लूमुळे पहिल्यांदाच हिवाळ्यात अंडे आणि चिकनची मागणी घटली असून दर निम्यावर आल्यानंतरही खाद्यप्रेमींनी पाठ फिरवली आहे.पशु संवर्धन आणि आरोग्य विभाग जनजागृती करीत असतानाही लोकांनी मात्र बर्ड फ्लूचे चांगलीच धास्ती घेतली.

 

मटणाचे भाव वाढणार
आवक घटली आणि मागणी वाढली की आपोआप वस्तूंचे दर वाढतात हे आजतागायतचे समीकरण आहे.चिकन आणि अंड्याकडे खाद्यप्रेमींनी पाठ फिरविल्याने मटणाचे भाव येत्या आठवड्यात वाढणार असल्याचे विक्रेत्यांच्या वतीने सांगण्यात आले.सध्या मटण 600 रुपये किलोच्या घरात असून आता दर पुन्हा एकदा वाढणार आहेत.

Advertisement

Advertisement