बीड दि.१३ (प्रतिनिधी)-बीडमधील पोलीस अधीक्षक पदाची कारकीर्द वादग्रस्त ठरलेले नंदकुमार ठाकूर यांची अखेर दौंडच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य म्हणून रवानगी करण्यात आली आहे.मागील आठवड्यात त्यांची बीडहून बदली करण्यात आली होती, मात्र त्यांना नियुक्तीच्या प्रतिक्षेत ठेवण्यात आले होते.
बीडचे माजी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची बीड जिल्ह्यातील कारकीर्द वादग्रस्त ठरली.जिल्ह्यात झालेला हिंसाचार,पोलीस दलात वाढलेली लाचखोरी, कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना आलेले अपयश या आणि अशा अनेक गोष्टींबद्दल राज्य पातळीवर बीड जिल्हा पोलिसांची प्रतिमा डागाळली होती.घटकप्रमुख म्हणून पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याबद्दल देखील वरिष्ठाकडे देखील नाराजी होती. मागच्या आठवड्यात त्यांची बीड येथून बदली करण्यात आली. त्यांच्या जागी अविनाश बारगळ यांची नियुक्ती करण्यात आली.मात्र ठाकूर यांना नियुक्ती देण्यात आली नव्हती.
नंदकुमार ठाकूर हे पुणे येथे नियुक्ती मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. मात्र पुणे येथील कोणत्याही कार्यकारी पदावर त्यांना नियुक्ती देण्यास खुद्द महासंचालक कार्यालयच अनुकूल नव्हते अशी माहिती आहे. यापार्श्वभूमीवर आता त्यांच्या नियुक्तीचे आदेश आले असून त्यांना दौंडच्या पोलीस प्रशिक्षण महाविद्यालय प्राचार्य म्हणून नेमण्यात आले आहे. ते आता नवीन पोलीस अधिकाऱ्यांना 'पोलिसिंग' चे धडे देतील.