Advertisement

बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने करा कार्यमुक्त

प्रजापत्र | Saturday, 10/08/2024
बातमी शेअर करा

बीड-पोलीस अधिक्षक म्हणून अविनाश बारगळ यांनी शनिवारी पदभार घेतल्यानंतर दुपारी पोलीस अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.या बैठकीत बारगळ यांनी बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त करण्यात यावे अशा सूचना संबंधित ठाणे प्रमुख व शाखा प्रमुखांना दिल्या आहेत.विशेष म्हणजे बदल्या करून आठ दिवसांपेक्षा अधिकचा कालावधी उलटून गेल्यानंतर ही कर्मचारी त्याच ठिकाणी ठाण मांडून बसले होते, यावर दैनिक प्रजापत्रने प्रकाश टाकल्यानंतर बारगळ यांनी पदभार घेताच तातडीने कारवाईसाठी सुरुवात केल्याचे पाहायला मिळते.

     बीड जिल्ह्यातील पोलीस दलात कार्यकाळ पूर्ण झालेले व संलग्न असलेल्या कर्मचाऱ्याच्या संदर्भाने तत्कालीन पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी बदली आदेश काढले होते. त्यानुसार अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यातील अनेक कर्मचारी नवीन ठिकाणी नियुक्त झाले. मात्र काही ठाणेप्रमुख आणि विशेष शाखामधून कर्मचाऱ्यांना सोडण्यात आले नव्हते. आठ दिवसापेक्षा अधिकचा कालावधी उलटल्यानंतर ही अनेक कर्मचारी आहेत त्याच ठिकाणी ठाण मांडून बसले होते. यावर 'प्रजापत्र'ने प्रकाश टाकल्यानंतर आज पदभार घेताच अविनाश बारगळ यांनी प्राधान्याने संबंधित अधिकाऱ्यांना बदली ठिकाणी कर्मचाऱ्यांना सोडण्याच्या सूचना केल्या. विशेष म्हणजे जे प्रमुख अधिकारी आज रात्री १२ पर्यंत कर्मचाऱ्यांना सोडणार नाहीत त्या कर्मचाऱ्यांना नियंत्रण कक्षात नियुक्त केले जाईल असा इशारा ही अविनाश बारगळ यांनी बैठकीत दिल्याचे कळते.

Advertisement

Advertisement