बीड दि.८ (प्रतिनिधी)-पोलीस कर्मचाऱ्यांना संलग्नता देऊन बदली धोरणाला हरताळ फासण्याच्या प्रकाराला चाप लावण्यात आल्यानंतर तरी एलसीबीला स्वतःची जहागिरी समजणाऱ्या काहींना धक्का बसेल असे वाटले होते,मात्र एलसीबीमधून ज्यांच्या बदल्या झाल्या असे कर्मचारी बदली आदेशाला आठवडा उलटूनही अद्यापही एलसीबीमध्येच ठाण मांडून असल्याचे चित्र आहे.इतरही काही 'मोक्याच्या' ठिकाणावरचे कर्मचारी बदली नंतरही 'कार्यमयुक्त' झाले नसल्याची परिस्थिती आहे.
बीड जिल्हा पोलीस दलातील बदल्या नेहमीप्रमाणे याहीवेळी चर्चेचा विषय ठरल्या आहेत.पोलीस दलातील बदल्यांना आता आठवडा उलटला आहे. अगोदर बदल्या करताना 'मोक्यावरच्या' लोकांना धक्का लागणार नाही अशी काळजी घेतली गेली.त्यातूनही ज्यांच्या बदल्या झाल्या त्यांनी तातडीने कार्यमुक्त होणे आवश्यक होते,तसे आदेश देखील काढण्यात आले होते.त्यानुसार अनेक ठिकाणचे कर्मचारी बदली झालेल्या ठिकाणी रुजू झाले देखील,मात्र एलसीबीसारखी मलाईदार शाखा यालाही अपवाद ठरली आहे.एलसीबीमधून ज्यांच्या बदल्या झाल्या,त्यांना अद्यापही (८ तारखेच्या सकाळपर्यंत) कार्यमुक्त करण्यात आलेले नाही.त्यामुळे बदलीनंतरही हे कर्मचारी नेमके कोणत्या 'कर्तव्यपूर्ती' साठी त्याच ठिकाणी टिकून आहेत याची चर्चा सध्या जोरात आहे.
एलसीबीमधून एलसीबीमध्येच
पोलीस महासंचालक कार्यालयाने संलग्नता देऊ नये असे आदेश काढले, मात्र आता त्या आदेशातून देखील पोलीस अधीक्षकांनी पळवाट काढली आहेच. बदल्यांचे अधिकार पोलीस अधीक्षकांना आहेत,त्याचा वापर करत आतापर्यंत एलसीबीमध्ये संल्गन असलेल्या कर्मचाऱ्याला आता एलसीबीमध्ये थेट नियुक्ती देण्यात आली.तर बीड,धारूर,अंबाजोगाई,आष्टी अशा प्रमुख शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी संल्गन असलेल्या कर्मचाऱ्यांना त्याच शहरातील इतर ठाण्यांमध्ये,उपविभागीय पोलीस अधीक्षकांकडे,जिल्हा मुख्यालयातील वेगळ्या शाखेत बदलीने नियुक्ती देण्यात आली आहे.म्हणजे या लोकांना 'आपले' शहर सोडावे लागणार नाही याची तजवीज करण्यात असल्याचे आदेशातून समोर येत आहे.