संभाजीनगर : आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच नेतेमंडळी कामाला लागली असून आपले दौरे करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे अजित पवार, मराठा नेते मनोज जरांगे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर तर प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू हेही विविध दौऱ्यावर आहेत. आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना आमदार बच्चू कडू यांनी अंध-अपंग बांधवांच्या समस्या ऐकून घेत प्रशासकीय व ई-रिक्षा कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी, त्यांनी कडूस्टाईलने एका अधिकाऱ्याला हलकीशी कानशिलात लगावली. दिव्यांग बांधवांना समाज कल्याण विभागाकडून देण्यात आलेल्या ई-रिक्षांमध्ये एकाच दिवसांत बिघाड झाल्याची तक्रार घेऊन दिव्यांग बांधव आमदार कडू यांच्याकडे गेले होते. त्यावेळी, आमदार कडू यांनी नेहमीप्रमाणे अधिकाऱ्यांची कानउघडणी केल्याचा पाहायला मिळालं.
प्रहार संघटनेच्या माध्यमातून आमदार बच्चू कडू दिव्यांग बांधवांच्या समस्या आणि त्यांच्यासाठी शासन दरबारी आवाज उठवतात. दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अनेकदा मोर्चे, आंदोलनेही काढली आहेत. तर, काहीवेळा, प्रशासकीय अधिकाऱ्यांशी पंगाही घेतला आहे. एखाद्या अधिकाऱ्याच्या कानशिलात लगाव, कुणावर लॅपटॉफ फेकून मार.. अशा बच्चू कडू यांच्या घटनाही सोशल मीडियात यापूर्वी व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आता, छत्रपती संभाजीनगरमध्येही तशीच एक घटना घडली. त्यामध्ये, प्रशासकीय अधिकाऱ्यांवर बच्चू कडू यांचा पारा चढल्याचं दिसून आलं.
आमदार कडू यांनी ई-रिक्षा देणाऱ्या योजनेशी संबंधित समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्याना जाब विचारला, तर ई-रिक्षा कंपनीच्या अधिकाऱ्याच्या कानाखाली लगावली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंध अपंग व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी समाजकल्याण विभागाकडून ई-रिक्षा देण्यात आल्या होत्या. मात्र, ज्या दिवशी या रिक्षा दिल्या, त्याच दिवशी त्या बंद पडल्या. या सगळ्या रिक्षा घेऊन अंध दिव्यांग व्यक्ती आमदार बच्चू कडू यांच्याकडे आले होते. त्यावेळी, बच्चू कडू यांनी संबंधितांना जाब विचारताना एका अधिकाऱ्यांना हलकीशी कानशिलात लगावल्याचं पाहायला मिळालं.