बीड दि. ८ (प्रतिनिधी ): शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे बडतर्फ जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या जामीन प्रकरणात आता आणखी एक ट्विस्ट आला आहे. खांडे यांच्या जामिनावर सुनावणी घेणाऱ्या उच्च न्यायालयाच्या पीठाने हे प्रकरण इतर पीठाकडे नेण्यास सांगितले असून त्यामुळे आता खांडेंच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणात शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात कुंडलिक खांडे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
कुंडलिक खांडे यांचा जामीन अर्ज बीडच्या जिल्हा न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. न्या. एस. जी. मेहरे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु झाली होती. मागच्या तारखेत सरकारी वकिल अमरजितसिंग गिरासे युक्तिवादासाठी वेळ मागून घेतला होता. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी ८ ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली होती. आज या प्रकरणाची सुनावणी सुरु झाल्यानंतर याच गुन्ह्याशी संबंधित एका आरोपीच्या अटकपूर्व जमिनीचे प्रकरण न्या. शिवकुमार डिगे यांच्यासमोर सुरु असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आली. काही महिन्यापूर्वीच उच्च न्यायालयातील कामकाजाच्या संदर्भाने काही निर्देश तयार करण्यात आले असून त्यात एखाद्या गुन्ह्यातील एखादे प्रकरण अगोदर ज्या न्यायालयासमोर सुरु आहे, त्या गुन्ह्याशी संबंधित इतर प्रकरणे देखील त्याच न्यायालयाने ऐकावीत असे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे आजच्या सुनावणी दरम्यान न्या. एस. जी. मेहरे यांनी याचिकाकर्त्याच्या वकिलांना या प्रकरणात न्या. शिवकुमार डिगे यांच्या बेंचसमोर जाण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता कुंडलिक खांडे यांच्या जमीन अर्जावरील सुनावणीला आणखी वेळ लागणार आहे. सध्या तरी खांडे यांचा मुक्काम कारागृहातच असणार आहे.