पुण्यामध्ये एका तरुणीचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. ही घटना फेब्रुवारी २०२१ मध्ये घडली होती. या प्रकरणात एकनाथ शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.
मात्र, ही याचिका न्यायालयाने निकाली काढावी किंवा ती मागे घेण्याची मुभा द्यावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी न्यायालयाकडे केली होती. त्यांच्या या भूमिकेचा समाचार घेत त्यांना न्यायालयाने खडसावले.
राजकारणी जनहित याचिकांच्या माध्यमातून राजकारण करत असून न्यायालयांना त्यात विनाकारण ओढत आहेत. राजकारण करण्याचा हा मार्ग नाही आणि तो कधीही स्पृहणीय नाही, असे ताशेरेही मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने चित्रा वाघ यांच्यावर ओढले.बदललेल्या राजकीय स्थितीनुसार तुमची भूमिका बदलते आणि राजकारण करण्यासाठी जनहित याचिकांचा माध्यम म्हणून वापर करून न्यायालयांना त्यात ओढले जात आहे, असे खडे बोल देखील न्यायालयाने सुनावले. न्यायालयाने खडसावल्याने चित्रा वाघ यांनी आपल्या वकिलाच्या मार्फत याचिका मागे घेणार नसल्याचे न्यायालयाला सांगितल्याची माहिती आहे.
नेमके काय प्रकरण?
टिकटॉक व्हिडीओसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील तरुणीचा ८ फेब्रुवारी २०२१ रोजी इमारतीवरून पडून मृत्यु झाला. या तरुणाचे नाव मंत्री संजय राठोड यांच्यासोबत जोडले गेले. राठोड यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. राठोड यांना महाविकास आघाडी सरकारमधील आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. राठोड यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याच्या मागणीसाठी वाघ यांनी २०२१ मध्येच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.