मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संबंधाने एक गुड न्यूज येत असून अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांपैकी तब्बल ८३ टक्के अर्ज वैध ठरले आहे. पात्र लाभार्थ्यांना पहिला हप्ता नेमका कधी मिळणार? याबाबत बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय होणार आहे.
मंत्रिमंडळ बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेवर सखोल चर्चा झाल्याची माहिती आहे. या योजनेसाठी राज्यभरातून १ कोटी ४० लाख ॲानलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. तर त्यातले ८३ टक्के अर्ज वैध ठरले आहेत. तबाबल १ कोटी महिला लाभार्थ्यांना पहिला हफ्ता रक्षाबंधनाच्या दिवशी मिळू शकतो. 'साम टीव्ही'ने हे वृत्त दिले आहे.
लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याची लाभार्थ्यांना ओढ लागून राहिली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशीच पहिला हप्ता मिळावा, यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर याबाबत स्पष्टता येणार आहे. दुसरीकडे राज्य शासनाने अर्ज दाखल करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे.
अर्ज करतानाच्या अडचणी...
ज्या महिलांनी अॅप व पोर्टलद्वारे अर्ज अपलोड केलेले आहेत त्यापैकी काही महिलांना त्यांचे अर्ज मंजूर झाल्याचा मोबाईल संदेश आला तर काही महिलांना त्यांचे अर्ज नामंजूर झाले असून त्यांना पुन्हा कागदपत्रे अपलोड करण्याच्या सूचना मोबाईल द्वारे दिल्या आहेत. मात्र त्या महिला कागदपत्रे अपलोड करण्यासाठी धावाधाव करू लागल्या मात्र पोर्टल आणि ॲप बंद असल्यामुळे महिलांना त्रास होत असल्याचं दिसून येतंय.
निधीचं काय?
राज्य सरकारच्या विविध खात्यांना प्रस्तावित केलेला निधी वेळेत खर्च होत नसल्याबद्दल महालेखापरीक्षकांनी (‘कॅग’) यापूर्वीच राज्य सरकार व विशेषतः वित्त विभागावर ताशेरे ओढले आहेत. असे असताना मार्च २०२३ च्या आर्थिक ताळेबंदातही सुमारे १,८१८ कोटी रुपये एवढी रक्कम अखर्चित राहिली असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ग्रामविकास विभागाचा तब्बल ८४१ कोटी रुपये इतका निधी अखर्चित राहिला आहे. यावर्षी सर्वच अखर्चित रक्कम ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या बहुचर्चित योजनेसाठी देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.