बीड-आठ दिवसांपूर्वी तालुक्यात बर्ड फ्लूमुळे कावळ्यांचा मृत्यु झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर तालुक्यातील ब्रम्हगांव व शिरापुर येथे देखील कोंबड्या दगावल्याची घटना उघडकीस आली.यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आष्टी तालुक्यातील साडेतीन लाख कोंबड्याच्या सुरक्षेसाठी पशुसंर्वधन विभागाने सात पथके तैनात केली आहेत. तालुक्यात पक्षी अथवा कोंबड्यांचा मृत्यु झाला तर याची माहिती कळविण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आष्टी तालुक्यात १९ व्या पशु गणणेनुसार ३ लाख ६६ हजार ५८१ एवढी कोंबड्याची नोंद आहे. सुशिक्षित बेरोजगार तरूण मोठ्या प्रमाणावर कुक्कुटपालन व्यवसायाकडे वळले आहेत. लाखो रुपयांची गुतवणुक करून उभा केलेल्या या व्यवसायाला आता कठिण दिवस आलेत. आठ दिवसांपासून शेजारील तालुक्यात बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याने कावळ्याचा मृत्यु झाला. त्याचबरोबर तालुक्यातील ब्रम्हगांव येथेही एक पक्षी मृत आढळून आल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेत बारा गावे कंटेनमेन्ट झोन घोषित केले. याच धर्तीवर अशा घटना कुठे घडल्या की लगेच पाहणी व निदानासाठी पंचनामा करून पुणे प्रयोगशाळेत पाठवण्यासाठी पशुसंर्वधन विभागाने सात पथके तयार केली आहेत. प्रत्येक पथकात एक पशुधन विकास अधिकारी, तीन सहाय्यक परिचर आहेत. पक्षी अथवा कोंबड्या मृत अवस्थेत आढळून आल्यास घाबरून न जाता पशुसंर्वधन विभागाला कळवावे असे आवाहन तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. मंगेश ढेरे यांनी केले आहे.
प्रजापत्र | Thursday, 14/01/2021
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा