Advertisement

सुजय विखेंनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला

प्रजापत्र | Thursday, 01/08/2024
बातमी शेअर करा

 अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत निलेश लंके यांनी पराभव केल्यानंतर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आता विधानसभा निवडणुकीकडे आपला मोर्चा वळवला आहे. संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची त्यांची तयारी असून पक्षाकडे याबाबत इच्छा व्यक्त केल्याची माहिती सुजय विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 

 

 

लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीची वेध लागले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून विधानसभेची जोरदार तयारी करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत अहमदनगरच्या जनतेने सुजय विखेंना डावलून निलेश लंके यांना पसंती दिली. यानंतर आता सुजय विखेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्याने अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा आहे. 

 

 

थोरात विरूद्ध विखे लढत? 
सुजय विखे यांनी संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. याबाबत त्यांनी पक्षाकडे इच्छा देखील व्यक्त केली आहे. जनता व पक्षाचा निर्णय झाल्यास निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटलंय. सुजय विखे पाटील हे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले तर त्याचा थेट सामना बाळासाहेब थोरात यांच्या रंगू शकतो. संगमनेर विधानसभेत बाळासाहेब थोरात हे सध्या विद्यमान आमदार आहेत. तर सुजय विखे यांनी राहुरी विधानसभा लढवल्यास प्राजक्त तनपूरे विरूद्ध सुजय विखे अशी लढत होणार आहे. आता सुजय विखे यांना नेमकी कुठल्या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार? थोरात विखे सामना रंगणार का? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.

 

Advertisement

Advertisement