Advertisement

बलात्काराच्या आरोपांनंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे राष्ट्रवादी कार्यालयात

प्रजापत्र | Thursday, 14/01/2021
बातमी शेअर करा

मुंबई-बलात्काराच्या गंभीर आरोपांनंतर एकीकडे विरोधक राजीनाम्याची मागणी करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे पक्ष कार्यालयात पोहोचले आहेत. पक्ष कार्यालयात अजित पवार, जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्यातील बैठक पार पडल्यानंतर धनंजय मुंडे पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी आरोपांनंतर पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

    धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, “मी स्वत: शरद पवारांकडे स्पष्टीकरण दिलं आहे. बुधवारी सकाळीच मी त्यांची वेळ घेतली आणि भेटून सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि माझं व्यक्तीगत जे म्हणणं आहे ते मी प्रेसनोटच्या माध्यमातून प्रसारमाध्यांना दिलं आहे”. धनंजय मुंडे यांना राजीनाम्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “याबाबत शरद पवार आणि पक्षातील मोठे नेते विचार करतील आणि त्याबाबत निर्णय होईल”.

दरम्यान याआधी शरद पवारांनी तक्रार गंभीर स्वरुपाची असून योग्य ती कारवाई केली जाईल असं सांगितलं. पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा करुन तातडीने पुढील पावलं उचलली जातील असं ते म्हणाले. “धनंजय मुंडे काल मला स्वत: भेटले. यावेळी त्यांनी प्रकरणाची संपूर्ण माहिती मला दिली. त्यांच्या माहितीनुसार, त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते, त्यातून काही तक्रारी झाल्या. पोलीस स्टेसनमध्ये तक्रार झाली आणि आता चौकशी प्रक्रिया सुरु झाली असेल. हे प्रकरण असं होईल आणि व्यक्तीगत हल्ले होतीलअसा अंदाज असावा म्हणून आधीच त्यांनी हायकोर्टात जाऊन आपलं म्हणणं मांडलं असेल. त्यांनी आदेश प्राप्त करुन घेतला होता. त्यामुळे त्याच्यावर आणखी भाष्य करण्याची गरज नाही,” असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

Advertisement

Advertisement