परीक्षेतील संभाव्य घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर याची फेरपरीक्षा घेण्यबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतंय? याकडं सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. यावर अखेर सुप्रीम कोर्टानं आपला निर्णय दिला असून नीटची फेरपरीक्षा होणार नसल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं आहे.
देशभरात वैद्यकीय सेवेसाठी अर्थात डॉक्टर होण्यासाठी घेण्यात येणाऱ्या अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात 'नीट' परीक्षा ५ मे २०२४ रोजी पार पडली होती. यावेळी देशभरातील विविध राज्यांमधील विविध परीक्षा केंद्रांवर एकाचवेळी पेपरफुटीचे प्रकार घडले होते. तसंच यापरीक्षेचा निकाल लागल्यानंतर त्यात काही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आले होते. अशा विविध गैप्रकारांच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलं होतं. आज सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर अंतिम सुनावणी झाली.
यावेळी सुनावणी दरम्यान, कोर्टानं काही महत्वाच्या टिप्पण्या केल्या होत्या. सुप्रीम कोर्टानं म्हटलं की, "सीबीआयच्या चौकशीचा अहवाल सांगतो की अद्याप या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. तसंच सीबीआयनं असं निरिक्षण नोंदवलंय की, हजारीबाग आणि पटना केंद्रावरीव १५५ विद्यार्थ्यांना पेपरफुटीचा फायदा मिळाला होता. पण याची सीबीआयची चौकशी अद्याप अंतिम टप्प्यात आलेली नाही"
सुप्रीम कोर्टानं यावेळी असंही म्हटलं की, "सध्याच्या टप्प्यावर परीक्षेचा निकाल चुकीचा आहे किंवा निकालात पद्धतशीरपणे फेरफार झाल्याचा निष्कर्ष रेकॉर्डवर आलेला नाही. रेकॉर्डवरील डेटा NEET-UG प्रश्नपत्रिका पद्धतशीरपणे लीक झाल्याचंही म्हटलेलं नाही. पण जर या परीक्षेच्या फेर परीक्षेचे आदेश दिल्यास या परीक्षेत बसलेल्या २४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांवर गंभीर परिणाम होतील. त्यामुळं संपूर्ण NEET-UG परीक्षा रद्द करण्याचा आदेश देणं समर्थनीय नाही"