Advertisement

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्यासह बैलजोडीचा मृत्यु 

प्रजापत्र | Monday, 01/07/2024
बातमी शेअर करा

दिंद्रुड- शेतात कोळपत असताना विजेचा तीव्र धक्का बसल्याने एक शेतकरी व दोन बैल ठार झाल्याची घटना आज, सोमवारी १ जुलै रोजी दुपारी १२ च्या  दरम्यान माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड शिवारात घडली. बालासाहेब बाबासाहेब डापकर (४०. रा.संगम ता. धारूर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

 

संगम येथील शेतकरी बालासाहेब बाबासाहेब डापकर हे दिंद्रुड शिवारातील शेतात आज सकाळी कामासाठी गेले होते. सकाळी ११ वाजे दरम्यान कोळपणी करत असताना औताच्या लोखंडी कोळप्याचा शेतातील खांबाच्या ताणतारेला स्पर्श झाल्याने विजेचा तीव्र धक्का बसून शेतकरी बालासाहेब डापकर आणि दोन्ही बैलांचा जागीच मृत्यु झाला. तर शेतकरी डापकर यांच्यासोबत असलेले दोन सालगडी विजेच्या धक्क्याने दूर फेकले गेले.

ताण तारेला असलेली चिमणी फुटलेली दिसत आहे. त्यामुळे वीज ताणतारेवर उतरून ही दुर्घटना घडून शेतकऱ्याचा मृत्यु महावितरणच्या निष्काळजीपणाने झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दरम्यान, धारूर तालुक्यात पंधरवड्यातील ही दुसरी घटना आहे. १५ जून रोजी शिंगणवाडी येथील तरुण शेतकरी देखील तान तारेला स्पर्श झाल्याने दगावल्याची घटना घडली होती.

Advertisement

Advertisement