Advertisement

 लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाने निवड

प्रजापत्र | Wednesday, 26/06/2024
बातमी शेअर करा

दिल्ली - लोकसभा अध्यक्षपदी एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाने निवड करण्यात आली आहे. लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब यांनी बिर्ला यांची निवड झाल्याचे घोषित केले.१८ व्या लोकसभेचे नवे अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी त्यांच्या आसनापर्यंत नेले. बिर्ला हे सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत.

 

 

सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, प्रतापराव जाधव, अनुप्रिया पटेल यांच्यासह एनडीएतील अनेक सदस्यांनी अनुमोदन दिले. इंडिया आघाडी च्यावतीने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी के. सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यांच्या नावाला सुप्रिया सुळे यांच्यासह आघाडीतील काही सदस्यांनी अनुमोदन दिले.

त्यानंतर महताब यांनी आवाजी मतदान घेत बिर्ला यांची निवड झाल्याचे जाहीर केले. एनडीएच्या तुलनेत आघाडीचे संख्याबळ कमी असल्याने बिर्ला यांची निवड निश्चित होते. त्यानुसार बिर्ला हे नवे अध्यक्ष म्हणून विराजमान झाले.

Advertisement

Advertisement