Advertisement

प्रदेशाध्यक्षपद सांभाळणं कोंबड्या पाळण्याइतके सोप्प नाही

प्रजापत्र | Wednesday, 12/06/2024
बातमी शेअर करा

मुंबई-   राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापनदिन सोहळा नुकतेच अहमदनगरमध्ये पाडला. या सोहळ्यात स्टेजवर बसलेल्या नेत्यांकडून एकमेकांवर खोचक टीका केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, पक्षात कुठं तरी अंतर्गत कलह तर सुरू नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हा पक्षांतर्गत कलह शरद पवारांची डोकेदुखी वाढवणारा ठरू शकतो. कारण, नगरमधील 25 व्या वर्धापनदिन सोहळ्यात रोहित पवार यांनी नाव न घेता थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यावर टीका केल्याचे दिसून येते. त्यानंतर, राज्यात चर्चा सुरू झाली ती पक्षांतर्गत सुरु असलेल्या कलहाची. त्यातच, रोहित पवार समर्थक आणि जयंत पाटील समर्थकही सोशल मीडियातून भिडल्याचं पाहायला मिळालं. 

 

 

रोहित पवार यांनी घेतलेली भूमिका ही नक्कीच नवीन नव्हती. कारण, लोकसभा निवड़णुका पार पडल्यानंतर रावेरच्या जागेवरुन रोहित पवार यांनी रोहिणी खडसेंना लक्ष करत आमच्याच पक्षातील लोकांनी काम केलं नसल्याची खंत फेसबूक पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली होती. रावेर मतदारसंघात श्रीराम पाटील यांनी चांगली लढत दिली. मात्र, संघटनेकडून आवश्यक ती ताकद न मिळाल्यानं त्यांना यश आलं नाही. यासोबतच या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी त्यांचं काम केलं नाही, असे रोहित पवार यांनी म्हटलं होतं. तर, जयंत पाटील यांच्याबाबत देखील रोहित पवारांच्याच जवळच्या कार्यकर्त्यांने पोस्ट करत आता त्यांना बदला अशी मागणी केली होती. ''निष्ठावान लढाऊ नेते शशिकांत शिंदे आणि युवा आमदार रोहित पवार यांच्यावर आता प्रदेश पक्ष संघटनेची मुख्य जबाबदारी द्यायला हवी. तसेच, सर्वांना सोबत घेऊन राष्ट्रीय पातळीवर सुद्धा पक्ष संघटना वाढवली पाहिजे, असेही लवांडे यांनी म्हटले होते.

 

जयंत पाटील समर्थकांचा पलटवार
लवांडे यांच्या ट्विटनंतर जयंत पाटील यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अॅड. भूषण राऊत यांनी नाव न घेता थेट रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला. ''राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळणे कोंबड्या पाळण्याइतके सोप्पे नाहीये'', असे ट्विट राऊत यांनी केले आहे. राऊत यांच्या ट्विटचा रोख थेट रोहित पवारांवर असल्याचे दिसून येते. कारण, बारामती अॅग्रोच्या माध्यमातून रोहित पवार यांचा पोल्ट्रीचाही मोठा उद्योग आहे. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसमधील शितयुद्ध पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलं आहे. 

Advertisement

Advertisement