भाजपवाले कितीही म्हणाले किंवा संघाने कितीही नाकारले तरी भाजप संघाशिवाय अपुरा आहेच. कधी कधी भाजपला अचानक संघाचे जोखड फेकून द्यावे असे वाटू शकते, मध्यंतरी जे.पी नड्डा तसे बोललेही होते, मात्र भाजपला संघाला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही हे देखील वास्तव आहे. कदाचित त्यामुळेच संघ शिक्षा वर्गातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मणिपूरपासून अहंकारापर्यंत केंद्र सरकारला म्हणजेच मोदींना कानपिचक्या दिल्या आहेत, त्याचा तरी मोदी आणि त्यांचा कंपू विचार करणार आहे का?
संघाचा संघ शिक्षा वर्ग आणि त्याच्या समारोपाला होणारे सरसंघचालकांचे भाषण हे नेहमीच चर्चेचा विषय असतो. देशात घडणाऱ्या घडामोडींच्या संदर्भाने संघाची नेमकी भूमिका काय हे सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत असतो. देशातील लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आणि भाजपची 'स्वबळाची' गुर्मी उतरल्यानंतर झालेल्या संघ शिक्षा वर्गाला म्हणूनच वेगळे महत्व होते. या वर्गाचा समारोप होताना, सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले भाषण म्हणजे भाजपच्या आणि मूळतः नरेंद्र मोदींच्या डोळ्यात घातलेले झणझणीत अंजन आहे.
भलेही सरसंघचालकांनी बोलायला उशीर केला असेल, मात्र ते जे काही बोलले ते भाजपने विचार करावा असे आहे. मणिपूर प्रकरणात केंद्र सरकारने जी भूमिका घेतली, त्यावर देशभरात काहूर उठलेले आहेच. मणिपूर जळत असतांना, तेथील महिला सुरक्षित नसतांना तेथील भाजपच्या आशीर्वादाचे राज्य सरकार आणि केंद्रातील भाजपचे सरकार, दोघेही मूकदर्शक बनले होते. देशाच्या इतिहासात गुजरात दंगलीच्या वेळी जे घडले तेच मणिपूरच्या बाबतीत घडत होते. गुजरात दंगलीच्या वेळी किमान तत्कालीन राज्य सरकारला 'राजधर्माची' आठवण करून द्यायला अटलबिहारी वाजपेयींसारखे पंतप्रधान तरी होते, मणिपूर त्याही बाबतीत कमनशिबी ठरले. आता इतक्या उशिरा का होईना सरसंघचालकांना मणिपूर आठवले हे ही नसे थोडके. सरसंघचालक जे बोलले त्यातून मणिपूरच्या बाबतीत केंद्र सरकारचा पर्यायाने नरेंद्र मोदींचा बुरखाच फाडला गेला आहे. त्या सरकारचे नाकर्तेपण आता भाजपचा आधार असलेल्या संघानेच दाखवून दिले आहे, आणि म्हणूनच उशीराने असले तरी भागवत यांच्या वक्तव्याला महत्व आहेच.
मणिपूरला जोडूनच भागवतांनी सत्तेच्या अहंकारावरही भाष्य केले आहे. मागच्या दहा वर्षात 'राष्ट्रप्रथम' म्हणणारांनीच देश म्हणजेच मोदी आणि मोदी म्हणजेच देश असेच वातावरण निर्माण केले होते. ते अगदी काल परवाच्या लोकसभा निवडणुकीतील प्रचारापर्यंत सुरु होतेच. सरकारची किंवा पक्षाची नव्हे तर 'मोदींची गॅरंटी' म्हणून प्रचार केला गेला. हे सारे संघाच्या चौकटीत बसणारे नक्कीच नव्हते. संघात व्यक्तिपूजेला तितकेसे स्थान नाही, किंबहुना स्थानच नाही. तरीही ज्या सरकारला आणण्यासाठी संघाने प्रयत्नांची शिकस्त केली होती, संघ भलेही स्वतःला राजकारणापासून दूर आहोत असे सांगत असेल, मात्र संघ स्वयंसेवक ज्या प्रचारात आघाडीवर होते, त्या मोदींनी सत्तेवर आल्यांनतर रुजविले काय असेल तर व्यक्तिस्तोम आणि त्यामुळेच या लोकसभा निवडणुकीत संघ फारसा सक्रिय नव्हता असेच सांगितले जाते. त्यामुळे देखील अहंकारापासून दूर राहण्याचा भागवतांनी दिलेला सल्ला महत्वाचा ठरतो.
भाजपचे सध्याचे अध्यक्ष असलेल्या जे.पी नड्डा यांनी काही दिवसांपूर्वी भाजपात संघाचा हस्तक्षेप नाही असे सांगितले होते, मात्र आता भाजपचा अध्यक्ष निवडण्याची जबाबदारीच संघावर टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपने कितीही दूर जायचा प्रयत्न केला तरी संघ ही त्यांची मजबुरी आहे. त्यामुळेच आता भागवतांनी दिलेल्या घरच्या आहेराचे चिंतन मोदींना करावे लागेल. अगोदरच स्वतःचे एकट्याचे स्पष्ट बहुमत नसल्याने त्यांना मित्र पक्षांच्या कुबड्या घेणे भाग आहे, त्यातच जर संघाने आपला हात भाजपच्या डोक्यावरून काढला तर भाजपची अवस्था आणखी वाईट व्हायला वेळ लागणार नाही.