Advertisement

आता शाळेत शिकवली जाणार भगवदगीता

प्रजापत्र | Friday, 24/05/2024
बातमी शेअर करा

  राज्य सरकारने इयत्ता तिसरी ते बारावीच्या शालेय अभ्यासक्रमात श्रीमद भगवद्गीतेचा समावेश करण्याचा विचार केला आहे. आता लवकरच राज्य मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना भाषा विषयात मनाचे श्लोक आणि भगवदगीतेचा बारावा अध्याय पाठ करावा लागणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, 'एससीईआरटी'ने  राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत.

मुलांना आपल्या देशातील परंपरांची ओळख करुन देणं आणि त्याबद्दल अभिमानाची भावना जागृत करणं हा त्यामागील उद्देश असल्याचं सांगण्यात आलं आहे. आता या निर्णयाला अनेकांचा विरोध देखील होऊ शकतो आणि त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

 

 

तिसरी ते बारावीचा अभ्यासक्रम कसा असणार?
भाषा विषयांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा अध्याय पाठ करायला लावावा, असं SCERT ने सुचवलं आहे. तिसरी ते पाचवीपर्यंत १ ते २५ मनाचे श्लोक, सहावी ते आठवीसाठी २६ ते ५० मनाचे श्लोक आणि नववी ते बारावीसाठी भगवद्गीतेतील बारावा अध्यायाच्या पाठांतरांची स्पर्धा आयोजित करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

भारतीय संस्कृतीच्या इतर बाबीही शिकवल्या जाणार
त्याचप्रमाणे भगवद्गीतेतील ज्ञानयोग, आत्मज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग यांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात यावी. भारतीय ऋषींची दीनचर्या कशी होती, त्यांचा आहार कसा होता, गुरुशिष्य परंपरा यांचीही ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात यावी, अशी अपेक्षा आता व्यक्त करण्यात आली आहे. विज्ञान, गणित या विषयांमध्येही भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश करण्याचं आराखड्यात नमूद करण्यात आलं आहे.

 

 

राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य
मराठी माध्यमाव्यतिरिक्त इतर माध्यमांमध्येही मराठी भाषा शिकवणं आता बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र, अभ्यासक्रम आराखड्यात अद्यापही त्याबाबत स्पष्ट तरतूद नाही. मराठी व्यतिरिक्त इतर भाषा माध्यमांच्या शाळांमधील भाषा निवडीचे पर्याय कसे असावेत, याबाबत अद्यापही संभ्रम आहे.

महाराष्ट्र राज्यात इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, पंजाबी, सिंधी, तामिळ माध्यमांच्या शाळा आहेत. या शाळांमध्ये स्थानिक भाषा मराठी असल्याने तीच प्राथमिक भाषा करायला हवी होती. परंतु, या बाबतीत अद्यापही कोणत्या स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या नाही.

Advertisement

Advertisement