तुळजापूर - श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे आयोजित शारदीय नवरात्र सांस्कृतिक महोत्सव २०२५ चा शुभारंभ सोमवारी २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी सैनिकी विद्यालयाच्या प्रांगणात झाला. पावसाळी वातावरण असूनही प्रेक्षकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.प्रेक्षकांच्या सोयीसाठी भव्य वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी गायक रोहित राऊत,जुईली जोगळेकर आणि पद्मनाभ गायकवाड यांच्या सुरेल गाण्यांनी ‘संगीत संध्या’ रंगली.
महोत्सवाचे उद्घाटन सौ.सौमय्याश्री पुजार,आमदार प्रवीण स्वामी व तहसीलदार तथा मंदिर संस्थान व्यवस्थापक माया माने यांच्या हस्ते झाले.यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, लेखाधिकारी संतोष भेंकी,पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी बचतगटाच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणाऱ्या अस्मिता अविनाश सूर्यवंशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या श्रीमती सूर्यवंशी यांना देवीची प्रतिमा,कवड्याची माळ, महावस्त्र व ११ हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. तसेच गायक कलावंतांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.पहिल्याच दिवशीच्या रंगतदार कार्यक्रमामुळे महोत्सवात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील नऊ दिवस भक्ती व संस्कृतीचा संगम प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.