बीड-माजलगावच्या पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता राजेश आनंदराव सलगरकर याला २८ हजारांची लाच घेताना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते.आज त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता त्याच्या घरातून लाखोंचे घबाड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती सापडले आहे.
चिंचोटी तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती काढून शेतात टाकण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग येथे तक्रारदाराने अर्ज दिला होता. सदर अर्जावरून मौजे चिंचोटी तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती काढून शेतात टाकण्यासाठी परवानगी देण्यासाठी प्रत्येकी ५ हजार प्रमाणे सात जणांचे ३५ हजारांची मागणी करून तडजोडअंती प्रत्येकी ४ हजार प्रमाणे प्रत्येकी ७ जणांकडून २८ हजारांची मागणी करत सलगरकर याने ही लाच स्वीकारली होती. त्याला रंगेहात पकडल्यानंतर त्याच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.त्याच्या राहत्या किरायाच्या घराची आज लाचलुतपत प्रतिबंधक विभागाने झाडाझडती घेतली असता यामध्ये रोख ११ लाख ७८ हजार ४६५ रुपये,२१ लाखाचे ३० तोळे सोने,२ लाख ७२ हजारांची ३ किलो ४०० ग्रॅम चांदी पोलिसांना आढळून आली आहे.सदर रोख रक्कम व सोने चांदीचे दागिन्यासह सर्व मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घेण्यात आल्याचे एसीबीच्या वतीने सांगण्यात येते.