Advertisement

 ऊसाच्या फडात आढळला वृद्धाचा जळालेला मृतदेह

प्रजापत्र | Saturday, 14/03/2026
बातमी शेअर करा

अंबाजोगाई दि.१४(प्रतिनिधी): तालुक्यातील ममदापूर शिवारात शनिवारी पहाटे एका ६० वर्षीय वारकरी वृद्धाचा ऊसाच्या शेतात जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. विश्वनाथ पांचाळ असे मृत व्यक्तीचे नाव असून, गेल्या अनेक दिवसांपासून ते क्षयरोगाशी झुंज देत होते.  

      ममदापूर येथील शेतकरी दिलीप मोतीराम देशमुख यांच्या गावालगत असलेल्या दोन एकर ऊसाला अचानक आग लागल्याचे त्यांच्या शेतमजुराच्या निदर्शनास आले. आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी धाव घेतली असता,ऊसाच्या सरीमध्ये एक व्यक्ती पूर्णतः जळालेल्या अवस्थेत दिसून आली. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात पाठवला. मृत विश्वनाथ पांचाळ हे उच्चशिक्षित असून वारकरी संप्रदायातील त्यांचे सक्रिय योगदान होते मात्र, गेल्या काही काळापासून त्यांना क्षयरोगाचा (टीबी) त्रास होता, ज्यामुळे ते मोठ्या मानसिक तणावात होते. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, अवघ्या आठ दिवसांपूर्वीच त्यांनी स्वतःवर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांच्या पश्चात दोन मुले, सून आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आजारपणाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असे प्रथमदर्शनी दिसत असले तरी मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आणि सखोल तपासानंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. 

Advertisement

Advertisement