Advertisement

३ लाख देऊन लग्न केले

प्रजापत्र | Friday, 08/03/2024
बातमी शेअर करा

कडा- ३४ वर्षीय तरुणाचे लग्न होत नसल्याने मध्यस्थी महिलेने एक मुलगी दाखवली. मात्र, लग्नासाठी ३ लाख द्यावे लागतील अशी अट घातली. मुलाने तीन लाख रुपये देऊन लग्न केले. मात्र, अवघ्या दोनच महिन्यात नवरी घर सोडून पसार झाली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नवरदेवाने आष्टी पोलिस ठाण्यात नवरीसह तिची बहिण, मध्यस्थी महिला आणि एका पुरुषावर गुन्हा दाखल केला आहे. 

आष्टी तालुक्यातील चिखली येथील एका ३४ वर्षीय तरूणाचे लग्न होत नसल्याने त्याने एका मध्यस्थी महिलेच्या माध्यमातून लग्नासाठी स्थळ निवडले. पण लग्न लावण्यासाठी ३ लाखांची मागणी करण्यात आली. ३ लाख दिल्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये दोघांचे लग्न झाले. दोन महिने नवरी घरी राहिली. पण त्यानंतर जानेवारीमध्ये नवरी अचानक पसार झाली. फोनवर संपर्क साधल्यावर चार,आठ दिवसात येते, असे उत्तर देत कारणे सांगून येणे टाळत होती. 

दरम्यान, नवरीचा मोबाईल बंद आढळून आला. दूसरा कुठलाच संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे तरूणाच्या लक्षात आले. यामुळे आष्टी पोलिस ठाणे गाठून तरुणाने सोलापूर येथील नवरी, तिची बहिण-दाजी आणि मध्यस्थी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे पुढील तपास करीत आहेत.
 

Advertisement

Advertisement