Advertisement

मोदींची वाटचाल हुकूमशाहीकडे; विरोधकांना संपविण्यासाठी

प्रजापत्र | Thursday, 02/05/2024
बातमी शेअर करा

 ‘‘मोदी सरकार विविध प्रकारची आश्वासने देऊन सत्तेवर आले; पण एकाचीही पूर्तता केली नाही. विरोधकांना संपविण्यासाठी कुठल्याही थराला ते गेले आहेत.दिल्लीत उत्तम रीतीने सरकार चालविले जात असताना, मोदींनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कारागृहात पाठवले. मोदींची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे,’’ असा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला.

 

 

चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निपाणीत बुधवारी (ता. १) सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी होते. शरद पवार म्हणाले, ‘‘भाजपने विविध प्रकारची अस्त्रे वापरून विरोधकांना अडकवण्याचे काम सुरू ठेवले आहे. शिवाय जनतेला भूलथापा देण्याचे कामही बंद नाही.याउलट राज्यातील काँग्रेस सरकारने सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि गरिबांसाठी योजना अमलात आणल्या. तरुणांकडे मोठी ताकद असून, त्यांना मोदी सरकार दुष्ट प्रवृत्तीकडे घेऊन जात आहे. परिणामी देशात अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुढील काळात घटक पक्षांनी एकत्र येऊन मोदी सरकारला उलथवणे गरजेचे आहे. देशातील यावेळच्या निवडणुकीकडे जगातील लोकांचे लक्ष लागले आहे.’’

 

रोजगार हिरावला!

अहमदाबादचे आमदार जिग्नेश मेवाणी म्हणाले, ‘‘भाजप सरकारने हजारो युवकांचा रोजगार हिरावला आहे. शेतमालासह इतर जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावून सर्वांचे कंबरडे मोडले आहे. शिवाय भाजप काळात महागाई वाढली आहे.’’

Advertisement

Advertisement