Advertisement

 उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क

प्रजापत्र | Thursday, 02/05/2024
बातमी शेअर करा

नवी दिल्ली- देशात सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. कारण, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. दुसरीकडे, तापमानात देखील प्रचंड वाढ झाली आहे. सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने लोकांना घराच्या बाहेर पडणे देखील कठीण झाले आहेत. कडक उन्हाच्या परिणाम मतदानावर पडत आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग सतर्क झाला आहे. 

 

मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने बिहारनंतर आता तेलंगणामध्ये देखील मतदान करण्याचा वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. १३ मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. तेलंगणा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका याच दिवशी होणार आहेत. तेलंगणामध्ये मतदानाची वेळ सकाळी सात पासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत होती. पण, ती वाढवून सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत करण्यात आली आहे.

 

हवामान विभागाच्या प्रमुखांनी नुकतेच तापमानाबाबत अपडेट दिली असून देशात पुढील पाच ते आठ दिवस उष्णता जास्त असणार असल्याचं म्हटलं आहे. याची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली आहे. एका नोटिशीमध्ये आयोगाने म्हटलंय की, तेलंगणातील १२ लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत लोकांना मतदान करता येणार आहे. यात करीमनगर, निजामाबाद, झहीराबाद, मेडक, मलकाजगिरी, सिकंदराबाद, हैदराबाद, चेवेल्ला, महबूबनगर, नगरकुर्नूल (SC), नलगोंडा आणि भोंगीर या मतदारसंघाचा समावेश असेल.

 

इतर ५ लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येईल. याआधी बिहारमध्ये मतदानाचा वेळ वाढवण्यात आला होता. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे.दरम्यान, राज्यात सध्या दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी पार पडणार आहे. सध्या उन्हाचा कडाका वाढला असल्याने लोक मतदान करण्यासाठी बाहेर पडत नाहीत अशी तक्रार आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्न करत आहे.

Advertisement

Advertisement