Advertisement

 माझ्यावर व उद्धव ठाकरेंवर टीका केल्याविना मोदींना स्वस्थता वाटत नाही – शरद पवार

प्रजापत्र | Thursday, 02/05/2024
बातमी शेअर करा

सांंगली- देश विकासासाठी सर्वच पंतप्रधानांनी काम केले आहे, मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात आल्यावर माझ्यावर आणि उद्धव ठाकरेंवर टीका केल्याविना स्वस्थता वाटत नसावी अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांनी गुरुवारी तासगावमध्ये झालेल्या सभेत केली.

महाविकास आघाडीचे उमेदवार चंंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ आज तासगावमध्ये महाविकास आघाडीची प्रचार सभा पार पडली. यावेळी पवार बोलत होते. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील, आमदार अरुण लाड, नितीन बानुगडे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना पवार म्हणाले, इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या, राज्यांमधल्या अनेक भागात त्या जात असत. देशातल्या गरीब लोकांची गरिबी कशी घालवायची हा विचार मांडत असत. देशातल्या सगळ्याच पंतप्रधानांनी हे काम केलं आहे. आत्ताचे पंतप्रधान (नरेंद्र मोदी) महाराष्ट्रात येतात. महाराष्ट्रात आले की त्यांना दोन लोकांची आठवण होते. एक उद्धव ठाकरे दुसरे शरद पवार. आम्हा दोघांवर टीका केल्याशिवाय त्यांना स्वस्थ बसवत नाही. पैलवान पाटील यांनी कुस्ती क्षेत्रात डबल महाराष्ट्र केसरी किताब दोन वेळा पटकावून नाव कमावले आहे. कुस्तीप्रमाणेच संसदेतही ते चांगले काम करतील.

यावेळी बोलताना राऊत म्हणाले, शिवसेना घराणेशाही पाहून अथवा कोण ताकदवान आहे हे पाहून उमेदवारी देत नाही. सर्वसामान्य घरातील कार्यकर्त्यांना संधी देत मंत्री, आमदार, खासदार ते मुख्यमंत्री केले आहे. सामान्यांच्या ताकदीवरच सांगलीत महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होईल यात आता शंका उरलेली नाही.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, चंद्रहार पाटील यांना उमेदवारी मी द्यायला लावली अशी चर्चा माझ्या बाबतीत केली जाते. मात्र काँग्रेस व शिवसेना यांचा हा प्रश्न असून महाविकास आघाडीने सर्वांच्या वतीने ही उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र काही मंडळी जाणीवपूर्वक माझी बदनामी सोशल मीडियावर करत आहेत.

Advertisement

Advertisement