यंदाच्या राम नवमीच्या उत्साह नेहमीच्या तुलनेत काहीसा अधिक आहे. एकतर देशात राम मंदिराच्या निर्मितीचा 'उत्सव' करण्यात सत्ताधारी भाजप यशस्वी झालेला आहे आणि दुसरे म्हणजे लोकसभा निवडणुकांचे वातावरण असल्याने त्यातील 'उत्साह' कमी होणे भाजपला परवडणारे नाही. म्हणूनच भारतीय संस्कृतीमधील श्रद्धास्थान असलेला राम आता राजकारणाचा भाग झालेला आहे. बहुसंख्यांकांची श्रद्धा म्हणून राम नवमी साजरी होत असतांना, त्या रामाला अभिप्रेत असणाऱ्या रामराज्याचे काय? ते कधी अवतरणार आहे?
श्रीराम किंवा अयोध्यापती राम, कायमच भारतीय संस्कृतीमधील एक महत्वाचे अंग राहिलेला आहे. पुराणपुरुष म्हणून वर्णिला गेलेले श्रीराम आणि त्यांचे चरित्र,कथा अगदी रामचरितमानसपासून ते वेगवेगळ्या रामायणांमधून आणि अगदी सिनेमांमधून वर्णिले गेले आहे. गावागावात कथा सप्ताहाच्या माध्यमातून हा श्रीराम पिढ्यानपिढ्या पोहचलेला आहे. देशातील कितीतरी गावांमध्ये रामनवमी एक परंपरागत उत्सव म्हणून कित्येक पिढ्यांनी साजरी केलेली आहे, साजरी करीत आहेत. मागच्या काही वर्षात पिढानपिढ्याच्या या उत्सवाला एक वेगळेच स्वरूप जाणीवपूर्वक देण्यात आले आहे.कोणत्याही संस्कृतीमधील कोणताही क्षण उत्सव म्हणून उत्साहाने साजरा होत असेल तर त्याला कोणी आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही,मात्र अशा व्यक्तीरेखा केवळ उत्सव आणि उत्साहामध्येच अडकवून त्यावर राजकारण होणार असेल तर मात्र संस्कृती म्हणून देखील याकडे गांभीर्याने पाहावे लागते.
श्रीरामाच्या चरित्राबद्दल काही मतप्रवाह असले तरी, रामराज्य म्हणून जी काही संकल्पना आहे ती म्हणजे 'जे जे सुंदर,उदात्त उन्नत महनमधुर ते ते' अशा धाटणीची आहे. समाजातील शेवटच्या घटकाला जिथे न्याय मिळतो, समाजातील प्रत्येकाला, त्याच्या सामाजिक स्थानाच्या पलीकडे जाऊन व्यक्त होण्याचा, अगदी राजाच्या कुटुंबाबद्दलही आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार असलेले राज्य म्हणजे रामराज्य असे अगदी सुरुवातीपासून आपल्या मनावर बिंबविले गेलेले आहे. तुलसीदासांच्या रामचरितमानसमधून असेल किंवा महात्मा गांधींनी आपल्या 'रामराज्या'च्या संकल्पनेतून 'सर्वांचे हित साधणारी व्यवस्था' म्हणून रामराज्याकडे पाहिले जाते आणि अशी व्यवस्था निर्माण करण्याचे नैतिक बंधन म्हणूनच जे स्वतःला रामाचे खरे भक्त म्हणवतात, किंवा रामाला देखील आम्हीच घर दिले असे सांगत मिरवत असतात, जे सत्तेवर होते म्हणूनच राम मंदिराचे निर्माण होऊ शकले असा अहंकार ज्यांच्या मनामनात आणि नसानसात भिनलेला आहे, यांची जवाबदारी जास्त आहे.
मात्र आज देशातले वातावरण काय आहे? सत्ता सर्वांप्रती समान न्याय करीत आहे का? सत्तेच्या खुर्चीवर बसून राग, लोभ, ममत्व, विद्वेष, क्रोध याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक नागरिकाला समान न्यायाने पाहण्याची दृष्टी सत्तेची आहे का? ज्या रामराज्यात अगदी राजाच्या कुटुंबाबद्दल बोलण्याला देखील राजद्रोह मानले गेले नव्हते, तशी व्यवस्था आपण निर्माण करु शकलो आहोत का? गरीब आणि श्रीमंतांमधली दरी अधिकाधिक वाढत आहे, रामराज्य म्हणजे कोणीच उपाशी असणार नाही असे राज्य, आज आपण त्या संकल्पनेपासून किती कोस दूर आहोत? या देशात सामान्यांच्या आरोग्याशी, जगण्याशी खेळ मांडला जातो आणि त्याच औषध कंपन्यांच्या जिवावर सत्ताधारी पक्ष गब्बर होतात, इथे ना महिला सुरक्षित आहे, ना बालके सुरक्षित आहेत, समाजातील शेतकरी, कष्टकरी वर्ग प्रचंड अस्वस्थतेत जीवन जगत आहे, आणि केवळ मूठभर घटकांना जगण्याची सारी संपन्नता लाभलेली आहे, मग समानतेची अपेक्षा करायची कशी? मग अशा व्यवस्थेला रामराज्य म्हणायचे काय? आज रामनवमीचा उत्सव साजरा करीत असताना रामाचे स्मरण केवळ पुराणपुरुष म्हणून करण्यातच धन्यता मानायची आहे का? राम आले आहेत, त्यांचे मंदिरही झाले आहे, पण रामराज्याचे काय? ते कधी येईल? आणि खरेच येईल...?