देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने अनेक योजना सुरू आहेत. तशी त्यांनी आता अजून एक योजना काढली आहे. 'भ्रष्टाचारी अभय योजना'! ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांनी भाजपमध्ये यावे. आम्ही तुम्हाला अभय देतो, ही 'मोदी गॅरंटी' आहे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री, शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर टीका केली आहे.
उद्धव ठाकरे कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर येथे आयोजित सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप आणि भाजप नेत्यांवर कडक शब्दांत वार केले. नाव रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी पण त्यामध्ये शिव्या घालायला शिकवतात का? अटल बिहारी वाजपेयी यांचा भारतीय जनता पक्ष होता, आता हा सगळा भाडोत्री पक्ष आहे. यांच्याकडे नेते कार्यकर्ते नाहीत, म्हणून आजूबाजूच्या आणत आहेत. असा टोला ठाकरेंनी लगावला आहे. यानंतर भाडोत्री म्हणा किंवा भाडखाऊ म्हणा अशा शब्दांत ठाकरेंनी भाजपला झोडपून काढले.