तलवाडा (प्रतिनिधी)- सुडाच्या भावनेतून शेजारी राहणाऱ्या एका महिलेने मयत मुलांच्या चुलतीशी संगनमत करून दोन चिमुकल्या बहिण-भावांना उंदिर मारण्याचे औषध देवून ठार मारल्याची धक्कादायक घटना पांढरवाडी (ता. गेवराई) येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी मयत बहिण-भावाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघींविरुध्द कलम ३०२,१२०-ब, ३४ भादवी प्रमाणे तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या धक्कादायक घटनेने गेवराई तालुक्यात खळबळ उडाली आहे.
गेवराई तालुक्यातील पांढरवाडी येथील तनुजा अमोल भावले (वय २ वर्ष) आणि किशोर अमोल भावले (वय १३ महिने) या दोघांना त्याच चिमुकल्यांच्या चुलतीने उंदिर मारण्याचे औषध चाटवून त्यांना जिवे मारल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की,तनुजा भावले आणि किशोर भावले या चिमुकल्या बहिण- भावाला दि.२९ डिसेंबर २०२३ रोजी दुपारच्या सुमारास अचानक उलट्या होवू लागल्या. त्यामुळे उपचारासाठी मुलगा किशोर याला बीडच्या एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर मुलगी तनुजा हिला छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दि. ३० डिसेंबर २०२३ रोजी मुलगी तनुजा हिचा तर मुलगा किशार याचा दि. १ जानेवारी २०२४ रोजी मृत्यू झाला. दोघांचाही अंत्यविधी पांढरवाडी येथे करण्यात आला. या प्रकरणात सुरूवातीला तलवाडा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र दि. १९ जानेवारी २०२४ रोजी मयत मुलांची चुलती स्वाती उमाजी भावले ही शेतात काम करत असतांना तिला कुणीतरी मारहाण केली. याविषयी तिच्याकडे विचारले असता तिने किशोर
आणि तनुजा यांच्या मृत्युच्या कारणावरुन मी कुणाला काही सांगू नये म्हणून शेजारी राहणाऱ्या सखुबाई ज्योतीराम भावले हीने दोन अनोळखी मुलांना मला मारहाण करण्यासाठी पाठवले होते असे कुटुंबियांना सांगितले. त्याचवेळी किशोर आणि तनुजा यांच्या मृत्यूचे खरे कारण समोर आले. एक ते दिड महिन्यापुर्वी शेजारी राहणाऱ्या सखुबाई ज्योतीराम भावले हिने स्वाती हिचा सासरा सुखदेव भावले याने माझी लेक वैशाली हिला नांदु दिले नाही. मला त्याचा बदला घ्यायचा आहे असे म्हणून मयत मुलांची चुलती स्वाती हिला मुलांना औषध खावू घालण्यास सांगितले मात्र स्वातीने नकार दिला. त्यानंतर पुन्हा १५ दिवसांनी शेजारी राहणाऱ्या सखुबाई 'भावले हिने स्वातीला 'मी तुला ४ लाख रूपये देईल, तेवढं काम कर, तुझा कोणाला संशय येणार नाही, तु असे केल्यास तुझी जावं येथे राहणार नाही, मग तु एकटीच इथे राहशील असे सांगितले' त्यानुसार सखुबाई भावले आणि स्वाती भावले या दोघींनी संगनमताने कट रचला आणि दि.२९ डिसेंबर २०२३ रोजी दुपारच्या सुमारास सखुबाई हिने आणुन दिलेले उंदिर मारण्याच्या ट्युबमधील औषध स्वाती हिने बोटावर काढून तनुजा आणि किशोर या दोघांना चाटविले. त्यानंतर त्यांना उलट्या झाल्या आणि उपचार सुरू असतांना दोघांचा मृत्यू झाला अशी तक्रार मयत मुलांचे वडिल अमोल सुखदेव भावले (वय २५ वर्ष) यांनी तलवाडा पोलिस ठाण्यात दिली. या फिर्यादीवरून सखुबाई ज्योतीराम भावले आणि स्वाती उमाजी भावले (माहेरकडील नाव-स्वाती गोरख झिंजे) दोघी रा. पांढरवाडी, ता. गेवराई यांच्याविरुध्द कलम ३०२, १०२-ब, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सपोनि शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि स्वप्निल कोळी, रामपुरी बीट जमादार पो.ह. महेश झिखरे, पो.ह.नारायण काकडे, पोलिस महिला हवालदार हजारे, महिला पोलिस अंमलदार घोषिर, घोडके, मदने पुढील तपास करत आहेत. याप्रकरणात दोन्ही महिला आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने २५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.