राज्यात मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा बांधव मुंबईकडे निघाले असून मुंबईतील आझाद मैदानावर २६ जानेवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. सरकारकडून जरांगे पाटलांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मराठा आरक्षणावरुन शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
"मनोज जरांगे पाटील यांची भूमिका योग्य आहे. आंदोलना नंतरच हे सरकार जागे होते. पाटील मुंबईच्या दिशेने चालले तेव्हा सरकारची धावपळ सुरू झाली. आतापर्यंत तुम्ही झोपला होता का? चेष्ठा करता का, समाजाला फसवता का? असा सवाल रोहित पवार यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच सरकारला आरक्षण द्यायचे नाही, फक्त फसवणूक करायची आहे, कशीतरी लोकसभेची निवडणूक काढायची आहे, असे गंभीर आरोपही रोहित पवार यांनी केले.
योग्य पाऊले उचलण्याची गरज...
"सरकारने लोकांना खेळवत न ठेवता, योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे. या सात दिवसात सगळी माहिती तुमच्याकडे येणार आहे का? कोणतेही सर्वे हे घाईगडबडीत होत नसतात, ते आधीच करायला पाहिजे होते, चुकीच्या प्रक्रियेमुळे अन्याय होण्याची शक्यता आहे.." असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.